पुणे : विश्वचषक स्पर्धेत खेळपट्टय़ांचे स्वरूप आणि दर्जा चांगला दिसून येत आहेत. ‘आयसीसी’ने याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष घातले आहे. स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. बाद फेरीचे सामने होतील तेव्हा फिरकी गोलंदाजांचे महत्त्व वाढलेले असेल. फिरकी गोलंदाजांची कामगिरी या टप्प्यात निर्णायक ठरेल, असे मत श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याने व्यक्त केले.

विश्वचषक स्पर्धेसाठी नियुक्त सदिच्छादूत म्हणून मुरलीधरन श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यासाठी येथे आला आहे. त्या वेळी मुरलीधरनने  फिरकी गोलंदाजांचे महत्त्व व्यक्त केले. ‘‘स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या केंद्रांवरील खेळपट्टी खरेच खूप चांगल्या होत्या. त्यांचा दर्जा राखण्यात आला होता. चेन्नई आणि नवी दिल्लीसारख्या मैदानावरील खेळपट्टय़ा संथ होत्या; पण इतके सामने खेळल्यावर तेवढा परिणाम होणारच आहे. त्यामुळेच स्पर्धेच्या उत्तरार्धात फिरकी गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरेल,’’ असे मुरलीधरन म्हणाला.

हेही वाचा >>>IND vs ENG: टीम इंडियाचा विजयी षटकार अन् गतविजेते बाहेर! भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंड चारीमुंड्या चीत, १०० धावांनी शानदार विजय

यंदाच्या स्पर्धेत अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स संघांच्या कामगिरीची चर्चा होत आहे; पण मला अफगाणिस्तानपेक्षा नेदरलँड्सच्या कामगिरीचे कौतुक आणि आश्चर्य अधिक वाटते, असे मुरलीधरन म्हणाला. ‘‘अफगाणिस्तानला कसोटी दर्जा तर मिळाला आहे; पण नेदरलँड्सला अजून तो दर्जा नाही आणि मायदेशात खेळताना ते वेगळय़ाच वातावरणात आणि वेगवान खेळपट्टय़ांवर खेळतात. त्यामुळे एकदम उपखंडातील संथ खेळपट्टय़ावर येऊन खेळताना त्यांनी दाखवलेला दर्जा नक्कीच आश्चर्य वाटणारा आहे,’’ असे मुरलीधरनने सांगितले.

भारत, विराट आणि अफगाणिस्तानची फिरकी सर्वोत्तम

या स्पर्धेत भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करत आहे. घरच्या मैदानावर खेळताना ते चांगले स्थिरावले आहेत. सर्वच आघाडय़ांवर त्यांची कामगिरी चांगली होत असल्यामुळे भारताला विजेतेपदाची अधिक संधी असेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करण्याची आकडेवारी पाहिली तर, विराट कोहली पाठलाग करताना सर्वोत्तम फलंदाज ठरतो हे निश्चित, तसेच या स्पर्धेत अफगाणिस्तानची फिरकी सर्वोत्तम दिसून येते. रशीद, मुजीब, मोहम्मद आणि नूर या चारही गोलंदाजांनी खूप प्रभावित केले आहे. त्यामुळेच आतापर्यंतच्या स्पर्धा प्रवासात भारतीय संघ, विराट कोहली आणि अफगाणिस्तानच्या फिरकीने जिंकून घेतले, असे मुरलीधरन म्हणाला.