Navjot Singh Sidhu on Viral Post: बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गेल्या काही काळात घेतलेल्या निर्णयांवर क्रिकेट वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले गेले. शुबमन गिलकडे कर्णधारपद देणे असेल किंवा रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरून बाजूला सारणे असेल.. या निर्णयावर नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले गेले होते. त्यातच या दोघांविरोधात काही फेक संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावानेही फेक संदेश पसरविण्यात आले होते.
यापैकी सर्वाधिक व्हायरल झालेल्या एका पोस्टवर आता खुद्द नवज्योतसिंग सिद्धू यांनीच भूमिका स्पष्ट केली आहे. बीसीसीआयने अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांची हकालपट्टी करावी, अशा आशयाची ही पोस्ट व्हायरल झाली होती.
काय लिहिले होते पोस्टमध्ये?
“जर भारताला २०२७ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा असेल तर बीसीसीआयने अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना लवकरात लवकर काढून टाकावे आणि रोहित शर्माला पुन्हा पूर्ण सन्मानाने कर्णधारपद सोपवावे”, अशा आशयाची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती.
या पोस्टनंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या एक्स हँडलवर एक जळजळीत पोस्ट शेअर केली आहे. हे विधान खोटे असल्याचे ते म्हणाले. “मी कधीही असे म्हटलेले नाही. खोट्या बातम्या पसरवू नका. मी अशी कल्पनाही कधी केली नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, या शब्दात नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपला संताप व्यक्त केला.

भारतीय संघ सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच टी-२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारतीय क्रिकेटपटू फेक बातम्यांना बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुनील गावस्कर, विराट कोहली, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विनसारखे खेळाडू खोट्या बातम्यांना बळी पडले आहेत.
अजित आगरकरच्या आगमनानंतर भारतीय संघाची वाटचाल
जून २०२३ मध्ये बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुखपदी आगरकरची नियुक्ती झाल्यापासून, भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या आगमनानंतर, भारतीय संघाने २०२३ चा आशिया कप जिंकला. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक उपविजेता बनला आणि २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता पुन्हा आशिया कप जिंकला आहे.