टोक्यो ऑलिम्पिक २०२० च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. या ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांमध्ये आणखीन एका बातमीची चर्चा आहे ती म्हणजे पुढील ऑलिम्पिक वगळल्यास त्यापुढील म्हणजेच २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासंदर्भात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिसमधील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. असं असलं तरी या प्रयत्नांपूर्वीच मागील अनेक वर्षांपासून आयसीसी क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्याचा प्रयत्न करत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अनेक नवीन संघ सध्या क्रिकेटच्या मैदानात घाम गाळताना दिसत असून या संघांमधील खेळाडूंचे कसब वाखाणण्याजोगं आहे. विशेष म्हणजे भारताच्या शेजारी असणाऱ्या अनेक देशांमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक देशांमधील नवीन खेळाडू सध्या चर्चेत आहे. नुकताच अशाच एका नवख्या खेळाडूचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला.

या खेळाडूचं नाव आहे गुलशन झा. नेपाळच्या संघातील या जलदगती गोलंदाजाचा व्हिडीओ त्याने टाकलेल्या एका भन्नाट चेंडूसाठी व्हायरल होतोय. झाने टाकलेला भन्नाट बाऊन्सर हा फलंदाजला चकवा देत थेट विकेटकिपरच्या हातात विसावल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र काठमांडू महापौर ११ या संघाच्या फलंदाजाला हा चेंडू कसा सोडावा हे न कळल्याने त्याने उडी मारत या चेंडूपासून दूर होण्याचा प्रयत्न केला. अगदी थोडक्यात हा खेळाडू जखमी होण्यापासून वाचला. हा खेळाडू भविष्यात नक्कीच नाव कमवेल असं हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी म्हटलं आहे. नेपाळ हा नुकताच क्रिकेटला वाव देणाऱ्या देशांपैकी एक असून आताच येथील खेळाडूंमधील ही चमक बघून क्रिकेट चाहत्यांनी समाधान व्यक्त केलंय

दरम्यान, क्रिकेटची लोकप्रियता वाढत असल्याने त्याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी आयसीसीने प्रयत्न सुरु केलेत. “एक गट स्थापन करण्यात आला असून त्यांच्यावर ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रक्रियेची जबाबदार असेल. ऑलिम्पिक २०२८, २०३२ आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल,” असं आयसीसीने म्हटलं आहे. आयसीसीने म्हटले आहे की, “सुमारे ३० दशलक्ष क्रिकेट चाहते अमेरिकेत राहतात, त्यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर ते खूप फायदेशीर ठरेल.” १२८ वर्षापुर्वी ऑलिम्पिकमध्ये क्रीकेट खेळल्या गेले होते. १९०० मध्ये पॅरिस येथे ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटन आणि यजमान फ्रान्सने या स्पर्धेत घेतला होता.