हरारे : या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य फेरी प्रवेशासाठी सध्या सुरु असलेल्या पात्रता फेरीत सोमवारी नेदरलँड्सने ‘सुपर ओव्हर’ मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला.
संपूर्ण सामन्यात तब्बल ७४८ धावांचा पाऊस पडला. वेस्ट इंडिजने निकोलस पूरनच्या (नाबाद १०४) शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद ३७४ धावा केल्या. त्याला किंगची (७६) साथ मिळाली. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना निदामानुरुच्या (१११) फटकेबाजीच्या जोरावर नेदरलॅँड्सने ९ बाद ३७४ धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्यामुळे घेण्यात आलेल्या एका षटकाच्या खेळात नेदरलॅँड्सने बाजी मारली. या पराभवाने दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजच्या मुख्य स्पर्धेत खेळण्याचा आशा अंधुक झाल्या आहेत. यापूर्वी त्यांना झिम्बाब्वेने देखील पराभूत केले आहे. सुपर ओव्हरच्या एका षटकांत व्हॅन बीकने सहा चेंडूंत (४,६,४,६,६,४) तीस धावा फटकावून काढल्या. हे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही. वेस्ट इंडिजने दोन फलंदाज गमावून केवळ ८ धावा केल्या.
व्हॅन बीकच्या या तुफानापूर्वी ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तेजा निदामानुरु आणि कर्णधार स्कॉट एडवर्डसने पाचव्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी करून नेदरलॅँड्सला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या. या दोघांनी अवघ्या ९० चेंडूंत ही भागीदारी केली. मात्र, त्यानंतर नेदरलॅँड्सने घाईत १४ धावांत ३ गडी गमावले आणि अखेरच्या दोन षटकांत ३० धावा असे समीकरण राहिले. त्या वेळी खेळपट्टीवर असणाऱ्या बीकने ४९व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंत १४ धावा घेतल्या. अखेरच्या षटकांत नेदरलॅण्डसला ६ षटकांत ९ धावांची आवश्यकता होती. मात्र, शेवटच्या चेंडूंवर विजयासाठी १ धाव आवश्यक असताना बीक (१४ चेंडूंत २८) बाद झाल्याने सामना बरोबरीत सुटला.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ब्रेंडन किंग (८१ चेंडूंत ७६) आणि जॉन्सन चार्ल्स (५५ चेंडूंत ५४) यांच्या १०१ धावांच्या सलामीनंतर निकोलस पूरनच्या फटकेबाजीने वेस्ट इंडिजचे आव्हान उभे राहिले होते. पूरनने ६५ चेंडूंत १०४ धावांची खेळी करताना ९ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली.
