New Zealand Beat Zimbabwe by an Innings and 359 Runs: न्यूझीलंडने झिम्बाब्वेविरूद्धची २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असा निर्भेळ विजय मिळवला आहे. न्यूझीलंड संघाने दुसरा कसोटी सामना अवघ्या ३ दिवसांत जिंकत मोठा इतिहास घडवला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात, यजमान झिम्बाब्वे संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात खराब कामगिरी केली आणि याचा न्यूझीलंडने फायदा घेत ऐतिहासिक विजय मिळवला.
न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेचा एक डाव आणि ३६९ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डाव आणि धावांच्या फरकाच्या बाबतीत हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. दुसऱ्या कसोटीत, न्यूझीलंड संघाने आपला पहिला डाव ३ गडी गमावून ६०१ धावांवर घोषित केला, त्यानंतर खेळाच्या तिसऱ्या दिवशी, किवी संघाकडून पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज झाचेरी फॉल्क्सने शानदार गोलंदाजी केली.
झाचेरी फॉल्क्सने पहिल्याच सामन्यात ५ बळी घेत धुव्वा उडवला आणि झिम्बाब्वेला ११७ धावांवर सर्वबाद केलं. दुसऱ्या डावात झाचेरी फॉल्क्सने ९ षटकं टाकली आणि फक्त ३७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय मॅट हेन्री आणि जेकब डफी यांनीही प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये एक डाव आणि धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय
इंग्लंड – एक डाव आणि ५७९ धावा (ऑस्ट्रेलियाविरुद्ध, १९३८)
ऑस्ट्रेलिया – एक डाव आणि ३६० धावा (दक्षिण आफ्रिकाविरुद्ध, २००२)
न्यूझीलंड – एक डाव आणि ३५९ धावा (झिम्बाब्वेविरुद्ध, २०२५)
वेस्ट इंडिज – एक डाव आणि ३३६ धावा (भारताविरुद्ध, १९५८)
न्यूझीलंड संघाच्या तीन खेळाडूंची दीडशतकं
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही न्यूझीलंडने शानदार फलंदाजी करत झिम्बाब्वेपासून सामना दूर नेला, ज्यामध्ये तीन फलंदाजांनी शतकं झळकावली. डेव्हॉन कॉनवेने १५३ धावांची खेळी केली, तर रचिन रवींद्रने १६५ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय हेन्री निकोल्सनेही १५० धावांची खेळी केली. यासह या तिन्ही फलंदाजांनी दीडशतकी खेळी केल्या, ज्याच्या जोरावर किवी संघ त्यांच्या पहिल्या डावात ६०१ धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी झाला.