IND vs NZ 2nd TEST : सिराज, अश्विनच्या माऱ्यासमोर पाहुणे ढेपाळले..! न्यूझीलंडच्या नावावर ‘लाजिरवाणा’ विक्रम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आपल्या नावावर ‘लाजीरवाणा’ विक्रम केला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आपल्या नावावर ‘लाजीरवाणा’ विक्रम केला आहे. सिराज आणि अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर पाहुणा न्यूझीलंडचा संघ अक्षरशः ढेपाळला. न्यूझीलंडला भारताच्या ३२५ धावसंख्येसमोर खेळताना केवळ ६२ धावा करता आल्या. यामुळे न्यूझीलंडच्या नावावर भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम झाला. भारताने न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलच्या गोलंदाजीला जशास तसे उत्तर देत या सामन्यावर आपली पकड मजबूत केलीय.

सर्वात कमी धावसंख्या करण्याच्या न्यूझीलंडच्या या ‘लाजिरवाण्या’ विक्रमाच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर ऑकलंड येथील इंग्लडचा सामना आहे. १९५५ मध्ये ऑकलंड येथे इंग्लंड विरुद्ध खेळताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ केवळ २६ धावा करून बाद झाला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावरची धावसंख्या ४२ आहे. १९४६ मध्ये वेलिंग्टन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळता न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४२ धावांमध्ये बाद झाला होता.

न्यूझीलंडची तिसऱ्या क्रमांकावरील नीचांकी धावसंख्या ४५ आहे. २०१३ मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ ४५ धावसंख्येवर तंबूत परतला होता.

न्यूझीलंडच्या नीचांकी धावसंख्येचे १० सामने खालीलप्रमाणे;

१. न्यूझीलंड वि इंग्लंड – एकूण २६ धावा – ऑकलंडमधील सामना (१९५५)
२. न्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया – एकूण ४२ धावा – वेलिंग्टनमधील सामना (१९४६)
३. न्यूझीलंड वि दक्षिण अफ्रिका – एकूण ४५ धावा – केपटाऊनमधील सामना (२०१३)
४. न्यूझीलंड वि इंग्लंड – एकूण ४७ धावा – लॉर्डमधील सामना (१९५८)
५. न्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया – एकूण ५४ धावा – वेलिंग्टनमधील (१९४६)
६. न्यूझीलंड वि भारत – एकूण ६२ धावा – मुंबईमधील सामना (२०२१)
७. न्यूझीलंड वि इंग्लंड – एकूण ६५ धावा – ख्रिसचर्चमधील सामना (१९७१)
८. न्यूझीलंड वि इंग्लंड – एकूण ६७ धावा – लॉर्डमधील सामना (१९७८)
९. न्यूझीलंड वि इंग्लंड – एकूण ६७ धावा – हेडिंग्लेमधील सामना (१९५८)
१०. न्यूझीलंड वि इंग्लंड – एकूण ६८ धावा – लॉर्डमधील सामना (२०१३)

भारतात झालेल्या नीचांकी धावसंख्या

न्यूझीलंड वि भारत – ६२ धावा – मुंबई (२०२१)
भारत वि वेस्ट इंडिज – ७५ धावा – दिल्ली (१९८७)
भारत वि दक्षिण आफ्रिका – ७६ धावा – अहमदाबाद (२००८)
दक्षिण अफ्रिका वि भारत – ७९ धावा – नागपूर (२०१५)

भारताविरुद्ध खेळताना झालेल्या नीचांकी धावसंख्या

न्यूझीलंड – ६२ धावा – मुंबई (२०२१)
दक्षिण अफ्रिका – ७९ धावा – नागपूर (२०१५)
इंग्लंड – ८१ धावा – अहमदाबाद (२०२१)
श्रीलंका – ८२ धावा – चंदीगड (१९९०)

न्यूझीलंड वि भारत कसोटी नीचांकी धावसंख्या

६२ धावा – मुंबई (२०२१)
९४ धावा – हेमिल्टन (२००२)
१०० धावा – वेलिंग्टन (१९८१)
१०१ धावा – ऑकलँड (१९६८)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या नीचांकी धावसंख्या

न्यूझीलंड वि भारत – ६२ धावा (२०२१)
ऑस्ट्रेलिया वि भारत – ९३ धावा (२००४)
भारत वि इंग्लंड – १०० धावा (२००६)
इंग्लंड वि भारत – १०२ धावा (१९८१)
भारत वि ऑस्ट्रेलिया – १०४ धावा (२००४)

मैदानात दिवसभरात नेमकं काय घडलं?

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या या कसोटीचा आज दुसरा दिवस असून भारताने आज ४ बाद २२१ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आज पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी करत उरलेल्या सहा गड्यांनाही बाद करत मोठा विक्रम नोंदवला. एजाजने १० बळी घेत भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी एजाजच्या या विक्रमाला चोख प्रत्युत्तर देत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आणला. रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना हात खोलू दिले नाहीत. न्यूझीलंडचा संघ २६३ धावांनी पिछाडीवर आहे. भारताने फॉलोऑन न देता आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली आहे.

न्यूझीलंडचा पहिला डाव

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भन्नाट गोलंदाजी करत न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळवून दिली नाही. त्याने कप्तान टॉम लॅथम (१०), विल यंग (४) आणि रॉस टेलर (१) यांना बाद करत तीन धक्के दिले. सिराजने टेलरची दांडी गुल केली. त्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेलने डॅरिल मिशेलला (८) पायचीत पकडल न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. विराटने रवीचंद्रन अश्विनला चेंडू सोपवला आणि अश्विनने हेन्री निकोल्सची (७) दांडी गुल केली. अवघ्या ३१ धावांत न्यूझीलंडचे ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज बाद करण्यात भारताने जास्त वेळ गमावला नाही. अवघ्या ६२ धावांत न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने ८ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद सिराजने ३ तर अक्षर पटेलने २ बळी घेतले. जयंत यादवला एक बळी मिळाला.

भारताचा पहिला डाव

भारताचे सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८० धावा केल्या. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. त्यानंतर चहापानापर्यंत भारताला अजून दोन धक्के बसले. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि कप्तान विराट कोहली यांना एजाजनेच शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आणि मयंकने किल्ला लढवला. या दोघांनी संघाला दीडशे धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दरम्यान मयंकने आपले अर्धशतकही पूर्ण केले. एजाजने पुन्हा गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने श्रेयसला (१८) यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर मयंकने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावसंख्या वाढवली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात मयंकने आपले शतक पूर्ण केले. मयंक-साहाने अर्धशतकी भागीदारी रचत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. दुसऱ्य़ा दिवशीही एजाजने दमदार सुरुवात करत प्रथम वृद्धिमान साहा (२७) त्यानंतर रवीचंद्रन अश्विनला (०) माघारी धाडले. सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर मयंकसोबत अक्षर पटेलने अर्धशतकी भागीदारी रचली. लंचनंतर एजाजने भारताला अजून दोन धक्के दिले. त्याने दीशतक ठोकलेल्या मयंकला आणि त्यानंतर अक्षरला बाद करत आपला आठवा बळी नोंदवला. मयंकने १७ चौकार आणि ४ षटकारांसह १५० तर अक्षरने ५ चौकार आणि एका षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्यानंतर एजाजने जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांचा अडथळा यांचा अडथला दूर करत विक्रमी १० विकेट्स घेतले. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपला. एजाज पटेलने ४७.५ षटकात ११९ धावांत १० बळी घेतले.

भारतीय संघात मोठे बदल

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. पहिल्या कसोटीत जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती आणि स्कॅनमध्ये सूज असल्याचे दिसून आले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. कानपूरमध्ये शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना रहाणेला हाताला किरकोळ दुखापत झाली. तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.

हेही वाचा : IND vs NZ 2nd TEST : एजाजच्या विक्रमाला भारताचं चोख उत्तर; अवघ्या ६२ धावांत न्यूझीलंड गारद!

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – मयंक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – विल यंग, ​​टॉम लॅथम (कप्तान), डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साऊदी, विल सोमरविले, एजाज पटेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New zealand lowest total against india in second test in wankhede stadium mumbai pbs

ताज्या बातम्या