आयपीएल २०२५ नंतर आता सर्वांचं लक्ष आगामी भारत वि. इंग्लंड दौऱ्यावर आहे. येत्या २० जूनपासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरूवात होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. यादरम्यान भारताच्या एका क्रिकेटपटूने बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
भारताचा क्रिकेटपटू नितीश राणा आणि त्याची पत्नी सांची मारवाह यांच्या घरी नव्या पाहुण्याचे स्वागत झाले आहे. नितीश राणाची पत्नी सांचीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. १४ जून रोजी त्यांच्या बाळांचा जन्म झाला. सांची मारवाहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
नितीश राणा आणि सांची मारवाह यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी या वर्षी मार्चमध्येच इन्स्टाग्रामवर जुळ्या मुलांचे पालक होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती.
सांची मारवाहने पोस्ट शेअर करत ३ फोटो त्यात पोस्ट केले आहेत. पहिला फोटो बेबी राणा अशी लिहिलेली उबदार चादर बाळाच्या अंगावर घातली आहे आणि नितीश राणाने त्याचा हात बाळावर ठेवला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये नितीशचं बोट बाळाने आपल्या चिमुकल्या हातांमध्ये धरल्याचा फोटो आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये सांचीने तिच्या टॅटूचा फोटो टाकला आहे.
नितीश राणा आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. गेली काही वर्ष तो केकेआर संघाचा कर्णधार होता. आयपीएल २०२३ मध्ये श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत त्याने केकेआर संघाचे नेतृत्त्वही केले होते. दरम्यान यंदाच्या आयपीएल २०२५ च्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले. यंदा नितीश राणा राजस्थानकडून खेळताना दिसला होता.
नितीश राणाची पत्नी सांची मारवाह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सांची ही इंटिरियर डिझायनर आहे. याचबरोबर अभिनेता कृष्णा अभिषेक याची ती बहिण आहे.