वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. पत्नी हसीन जहाँने केलेल्या तक्रारीनंतर पश्चिम बंगालमधील अलिपूर कोर्टाने शमीविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. आत्मसमर्पण करण्यासाठी कोर्टाने शमीला १५ दिवसांची मूदत दिली आहे. आगामी आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेआधी शमीची संघात निवड करायची की नाही यासाठी बीसीसीआय शमीच्या वकिलांशी चर्चाही करणार आहे. मात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतरही शमीविरोधात अद्याप कारवाई करणार नसल्याचं बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – BCCI शमीच्या वकिलांशी चर्चा करणार, संघातलं स्थान धोक्यात ?

“शमीविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे याची आम्हाला कल्पना आहे. मात्र त्यावर कारवाई होणार की नाही हे आता सांगणं कठीण आहे. सध्या बीसीसीआय या प्रकरणात थेट पडणार नाही. ज्या क्षणी आम्हाला आरोपपत्राची प्रत मिळेल, त्यातले तपशील वाचल्यानंतर शमीबद्दल काय निर्णय घ्यायचा हे ठरवण्यात येईल. मात्र आताच्या घडीला शमीविरोधात कोणतीही कारवाई होणार नाहीये.” बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने IANS वृत्तसंस्थेला माहिती दिली.

काय आहे प्रकरण?

अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीनं फेसबुकवरून केल्यानं गेल्यावर्षी एकच खळबळ उडाली. शमीची पत्नी हसीन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केलं होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला होता.

हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर या दोघांचाही वाद चव्हाट्यावर आला. मोहम्मद शमी, त्याचा भाऊ, त्याची आई हे आपला छळ करत असल्याचाही आरोपही हसीन जहाँने केला होता. पैशांसाठी आपल्याला उपाशी ठेवले गेले, माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता. आता या सगळ्या प्रकरणात पश्चिम बंगाल येथील अलीपूर कोर्टाने मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.