एपी, न्यूयॉर्क : पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करताना नोव्हाक जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जोकोविचने शनिवारी पुरुष एकेरीतील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात लास्लो जेरेला साडेतीन तासांपर्यंत चाललेल्या सामन्यात ४-६, ४-६, ६-१, ६-१, ६-३ असे नमवत आगेकूच केली.

२३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचची सुरुवात चांगली झाली नाही. पहिले दोन सेट गमावल्यानंतर जोकोविचवर दडपण होते. मात्र, दडपणात खेळ उंचावण्यासाठी जोकोविच ओळखला जातो आणि याचाच प्रत्यय जेरेविरुद्धच्या लढतीत आला. त्याने सलग तीन सेट जिंकत सामन्यात विजय नोंदवला. जोकोविचने कारकीर्दीत आठव्यांदा पहिले दोन सेट गमावल्यानंतर सामना जिंकला आहे. आपल्या कारकीर्दीत पाच सेटपर्यंत चाललेल्या ४९ पैकी ३८ सामने जोकोविचने जिंकले आहेत. पुढच्या फेरीत जोकोविचसमोर बोर्ना गोजोचे आव्हान असणार आहे. ‘‘हा सामना तणावपूर्ण होता. सुरुवातीला माझा खेळ निराशाजनक झाला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये मी चांगला खेळ केला. तिसऱ्या सेटमध्ये ‘ब्रेक पॉइंट’ मिळवल्यानंतर सामन्यात पुनरागमनाची संधी असल्याची मला जाणीव झाली,’’ असे जोकोविच म्हणाला.

पुरुष गटातील अन्य सामन्यात, अमेरिकेच्या १४व्या मानांकित टॉमी पॉलने स्पेनच्या २१व्या मानांकित अ‍ॅलेहांद्रो फोकिनाला ६-१, ६-०, ३-६, ६-३ असे नमवले. बेन शेल्टनने रशियाच्या असलान करात्सेवला ६-४, ३-६, ६-२, ६-० अशा फरकाने नमवले. तर, नवव्या मानांकित टेलर फ्रिट्झने चेक प्रजासत्ताकच्या पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या जेकब मेन्सिचवर ६-१, ६-२, ६-० असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. १९व्या मानांकित फ्रान्सिस टियाफोने पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर फ्रान्सच्या २२व्या मानांकित अ‍ॅड्रियन मन्नारिनोवर ४-६, ६-२, ६-३, ७-६ (८-६) असा विजय साकारला.

दरम्यान, महिला एकेरीत अमेरिकेच्या कोको गॉफने तीन सेटपर्यंत चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात विजय मिळवत चौथी फेरी गाठली. तर, चौथ्या मानांकित एलिना रायबाकिनाला पराभवाचा धक्का बसला. सहाव्या मानांकित गॉफने पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर एलिन मर्टेन्सवर ३-६, ६-३, ६-० असा विजय मिळवला. गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या गॉफला आगेकूच करायची झाल्यास कॅरोलिना वोझनियाकीचे आव्हान पार करावे लागेल. वोझनियाकीने जेनिफर ब्रॅडीवर ४-६, ६-३, ६-१ असा विजय साकारला. सोरेना क्रिस्टियाने तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात रायबाकिनाचा ६-३, ६-७ (६-८), ६-४ असा पराभव केला. क्रिस्टिया प्रथमच अमेरिकन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. पुढच्या फेरीत तिचा सामना १५व्या मानांकित बेलिंडा बेंचिचशी होणार आहे. तसेच, गतविजेत्या इगा श्वीऑनटेकने काजा जुवानला ४९ मिनिटांत ६-०, ६-१ असे सरळ सेटमध्ये नमवले. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील उपविजेती कॅरोलिना मुचोवाने टेलर टाउनसेंडला ७-६ (७-०), ६-३ असे पराभूत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोपन्ना-एब्डेन जोडी विजयी

भारताच्या रोहन बोपन्ना व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेन यांनी रोमन साफिउल्लिन व आंद्रे गोलुबेव जोडीला ६-३, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. पुढच्या फेरीत त्यांच्यासमोर ब्रिटनच्या ज्युनियन कॅश व हेन्री पॅटेन जोडीचे आव्हान असणार आहे.