अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन २०२१ स्पर्धेचे विजेतेपदही खिशात टाकले आहे. काही दिवसांपूर्वी फ्रेंच ओपन पटकावणाऱ्या जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या नवख्या माटिओ बेरेट्टिनीचा ६-७, ६-४, ६-४, ६-३ असा पराभव केला. जोकोव्हिचचे हे सहावे विम्बल्डन आणि २०वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यासह त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

तब्बल साडेतीन तास रंगलेल्या पुरुष एकेरीच्या या सामन्यात माटिओ बेरेट्टिनीने पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचला हैराण केले. या सामन्यात जोकोव्हिचच फेव्हरिट मानला जात असला, तरी दमदार आणि वेगवान सर्व्हिसेसमुळे बेरेट्टिनीने पहिला सेट आपल्या नावावर केला. त्यानंतर पुढच्या तीन सेटमध्ये जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावत बेरेट्टिनीला मागे ढकलले. शेवटच्या सेटमध्येही बेरेट्टिनीने आपल्या वेगवान सर्व्हिसेसचा धडाका सुरूच ठेवला. काहीसे आक्रमक आणि ड्रॉप शॉटच्या जोरावर जोकोव्हिचने ही लढत आपल्या नावावर केली.

 

 

हेही वाचा – टेनिस..क्रिकेट…पुन्हा टेनिस..! वाचा विम्बल्डनच्या ‘सम्राज्ञी’चा प्रवास

 

 

 

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेला बेरेट्टिनी हा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा  इटलीचा पहिला टेनिसपटू ठरला होता. त्याने जेतेपदाला गवसणी घातली असती, तरएड्रियाने पानाट्टा यांच्यानंतर ग्रँडस्लॅम (१९७६, फ्रेंच) जिंकणारा तो इटलीचा दुसरा टेनिसपटू ठरला असता. मात्र जोकोव्हिचने त्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. बेरेट्टिनीने याआधीच्या जोकोव्हिचविरुद्धच्या दोन लढती गमावल्या असल्या, तरी हिरवळीवर त्याने अलीकडे चांगली कामगिरी केली होती.