ढाका : अपयशाच्या गर्तेतून यशाचा मार्ग शोधण्यासाठी वेस्ट इंडिज संघाने सोमवारी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात प्रथमच निर्धारित ५० षटके टाकण्यासाठी चक्क पाच फिरकी गोलंदाजांचा वापर केला! वेस्ट इंडिजने एकदिवसीय सामन्यांत झालेला आजवरचा हा सर्वांत पहिला ‘प्रयोग’ करून बांगलादेशला २१३ धावांत रोखले खरे; पण नंतर बांगलादेशानेही आठच षटके जलदगती गोलंदाजाला देऊन उरलेल्या ४२ षटकांत वेस्ट इंडिजची ‘फिरकी’ घेतली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. अखेर ‘सुपर ओव्हर’मध्ये वेस्ट इंडिजने बांगलादेशला मात दिली, तीही पुन्हा ‘फिरकी’च्याच जोरावर!

वेस्ट इंडिजचा सध्या बांगलादेश दौरा सुरू असून, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी मीरपूरमध्ये शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये झाला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मंगळवारच्या सामन्यातील खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता वेस्ट इंडिजने संघात पाच फिरकी गोलंदाज खेळवले. या सामन्यासाठी वेस्ट इंडिजने अकिल हुसेन या फिरकी गोलंदाजाला मायदेशातून खास बोलावून घेतले.

निर्धारित सर्व ५० षटके फिरकी गोलंदाजांनी टाकण्याचा एकदिवसीय सामन्यातील हा पहिलाच प्रसंग ठरला असला, तरी दोन्ही बाजूंनी नवा चेंडू फिरकी गोलंदाजांना देण्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील हा पाचवा प्रसंग ठरला. यापूर्वी याच केंद्रावर बांगलादेशाने २०१८ मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी एकदा आणि २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध नवा चेंडू दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांच्या हाती दिला होता. सर्वांत आधी २०१७ मध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जतीन पटेल आणि मिचेल सँटनर या फिरकी जोडीकडे नवा चेंडू सोपविला होता.

फिरकीला साथ देणाऱ्या स्थितीचा वेस्ट इंडिजने पूर्ण फायदा उठवला. हुसेनसह रॉस्टन चेस, कॅरी पिएरे, गुडाकेश मोती आणि ॲलिक अथानाझे या फिरकी गोलंदाजांनी ही धुरा सांभाळली. एकवेळ या गोलंदाजांनी बांगलादेशाला २८ षटकांत ४ बाद ९६ असे रोखले होते. पण, त्यानंतर सौम्य सरकार (४५) आणि अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिशाद हुसेनच्या १४ चेंडूतील नाबाद ३९ धावांच्या तडाख्यामुळे बांगलादेशाला ५० षटकांत ७ बाद २१३ अशी समाधानकारक मजल मारता आली.

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनाही २१४ धावांचे आव्हान पेलताना संघर्ष करावा लागला. केसी कार्टी (३५) आणि ॲलिक अथान्झे (२८) वगळता एकही फलंदाज बांगलादेशाच्या फिरकीचा सामना करू शकले नाहीत. विशेष म्हणजे बांगलादेशकडूनदेखील नासुम अहमद आणि मेहदी हसन मिराज या फिरकी द्वयीने नवा चेंडू हाताळला. त्यानंतर तन्वीर इस्लाम आणि रिशाद हुसेन या अन्य फिरकी जोडीने वेस्ट इंडिजला रोखले. संपूर्ण सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून बांगलादेशाच्या मुस्तफिझूर रेहमानने आठ षटके टाकली. वेस्ट इंडिजच्या डावाच्या अखेरीस शाय होपला जस्टिन ग्रीव्हजची साथ मिळाल्यामुळे वेस्ट इंडिजने ५० षटकांत ९ बाद २१३ धावांची मजल मारली आणि सामना बरोबरीत सुटला.

सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने प्रथम खेळताना १ बाद १० धावा केल्या. बांगलादेशला एका गड्याच्याच मोबदल्यात ९ धावांचीच मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश ७ बाद २१३ (सौम्या सरकार ४५, रिशाद हुसेन नाबाद ३९,गुडाकेश मोती ३-६५) वेस्ट इंडिज ९ बाद २१३ (शाय होप ५नाबाद ३, कार्टी ३५, रिशाद हुसेन ३-४२)