New Zealand 2023 ODI World Cup Squad: न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (NZC)च्या सोशल मीडियाच्या ट्वीटर हॅण्डलवर विश्वचषक २०२३साठी राष्ट्रीय संघाची सोमवारी एका व्हिडीओद्वारे क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांनी घोषणा केली. मात्र, ही घोषणा एका अनोख्या पद्धतीने करण्यात आली त्यामुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. न्यूझीलंड संघाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे त्या व्हिडिओमध्ये, न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या जर्सी क्रमांकासह त्यांच्या प्रियजनांची सर्वांना ओळख करून दिली.
न्यूझीलंड क्रिकेटने २०२३ मध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. मात्र, विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर करण्याची त्यांची ही खास पद्धत सध्या खूप भाव खाऊन जात आहे. त्यांच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. न्यूझीलंड संघाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे व्हिडीओमध्ये, न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या जर्सी क्रमांकासह त्यांची ओळख करून दिली. कुणाची आई, कुणाची बायको, मुले, गर्लफ्रेंड यांनी न्यूझीलंड खेळाडूंची घोषणा केली.
या मनाला भावणाऱ्या व्हिडिओमध्ये केन विल्यमसनचे कुटुंब, ट्रेंट बोल्टचा मुलगा, रचिन रवींद्रचे आई-वडील आणि जिमी नीशमची आजी दिसत होती. या वर्षी मार्चपासून पायाच्या दुखापतीने त्रस्त असलेला केन विल्यमसन पुन्हा एकदा न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, गतविजेत्या इंग्लंडविरुद्धच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याचे खेळणे साशंक आहे.
२०१९ मध्ये झालेल्या गेल्या विश्वचषकात न्यूझीलंड संघ उपविजेता ठरला होता. लॉर्ड्सवर झालेल्या फायनलमध्ये यजमान इंग्लंड संघाचा पराभव झाला होता. नियमित षटकांमध्ये आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये सामना टाय झाल्यानंतर, चौकार-षटकार मोजण्याच्या नियमामुळे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. केन विल्यमसन आणि टीम साऊथी हे संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू आहेत. या दोघांनी २०११ पासून तीन क्रिकेट विश्वचषक खेळले आहेत.
उल्लेखनीय बाब अशी आहे की, न्यूझीलंड संघ ५ ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध खेळून मेगा स्पर्धेत आपला प्रवास सुरू करेल. यानंतर, ९ ऑक्टोबर रोजी, संघ आपला पुढील सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळेल. त्यानंतर किवीज त्यांच्या मोहिमेतील पुढील दोन सामने बांगलादेश (१३ ऑक्टोबर) आणि अफगाणिस्तान (१८ ऑक्टोबर) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळणार आहेत. यानंतर २२ ऑक्टोबरला केन विल्यमसन अॅड कंपनीचा सामना भारताशी होणार आहे. यानंतर न्यूझीलंड आपले पुढील चार सामने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध खेळणार आहे, जे अनुक्रमे २८ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर, ४ नोव्हेंबर आणि ९ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.
न्यूझीलंडचा २०२३ विश्वचषक संघ पुढीलप्रमाणे आहे: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, सोधी आणि विल यंग.