पीटीआय, बंगळूरु
प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवत आतापर्यंत आठही सामने जिंकलेल्या भारतीय संघासमोर आज, रविवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सचे आव्हान असेल. या सामन्यात भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीवर सर्वाचे लक्ष असेल. कोहलीला आपले ५०वे एकदिवसीय शतक साकारताना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची या सामन्यात संधी आहे.
भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित झाले असून नेदरलँड्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाला तसे फारसे महत्त्व नाही. मात्र, विश्वविजयाचे उद्दिष्ट बाळगलेला भारतीय संघ आपली लय कायम राखण्यासाठी निश्चित उत्सुक असेल. बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा हा सामना कोहलीसाठी खास ठरू शकेल. ‘आयपीएल’मध्ये कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे त्याच्यासाठी चिन्नास्वामी हे आता घरचे मैदानच झाले आहे. या मैदानावर आपले ऐतिहासिक शतक साकारायला कोहलीला नक्कीच आवडेल.
हेही वाचा >>>IND vs NED: टाईम आउट वादावर राहुल द्रविडचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “आम्ही असं करणार नाही पण कोणाला दोष…”
यंदाच्या स्पर्धेत कोहली फॉर्मातही आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक ५४३ धावा केल्या असून एकदिवसीय विश्वचषकात ५०० धावांचा टप्पा ओलांडण्यात त्याला प्रथमच यश आले आहे. यापूर्वी २०११च्या स्पर्धेत २८२, २०१५च्या स्पर्धेत ३०५ धावा, तर २०१९च्या स्पर्धेत ४४३ धावा त्याने केल्या होत्या. यंदा त्याच्या नावे दोन शतकेही आहेत. त्यामुळे कोहली आपली लय राखेल आणि ऐतिहासिक शतक चिन्नास्वामीवर करेल अशी बंगळूरुतील क्रिकेटरसिकांना आशा असेल.
’ चिन्नास्वामीची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल मानली जाते. त्यातच सीमारेषाही जवळ असल्याने या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.
’ कर्णधार रोहित शर्मा भारताच्या डावाला पुन्हा आक्रमक सुरुवात करून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. रोहित आणि शुभमन गिल यांनी डावाचा पाया रचल्यास त्यावर कळस चढवण्याची जबाबदारी कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्यावरच असेल.
’ भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित आहे. त्यामुळे आतापर्यंतचे आठही सामने खेळलेल्या जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांना विश्रांती देत शार्दूल ठाकूर आणि प्रसिध कृष्णा यांना खेळवण्याचा पर्याय भारताकडे आहे.
’ नेदरलँड्सच्या संघाने यंदाच्या स्पर्धेत आठपैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत करत सर्वाचे लक्ष वेधले. मात्र, त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही.
’ लोगन व्हॅन बीक आणि पॉल व्हॅन मीकरन या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आता भारताविरुद्ध त्यांची कसोटी लागेल. नेदरलँड्सच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार स्कॉट एडवर्डस आणि सायब्रँड एन्गलब्रेट यांच्यावर असेल.