कटक : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ओदिशा खुल्या बॅडिमटन स्पर्धेसाठी भारताच्या सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांना अनुक्रमे अग्रमानांकन लाभले आहे. प्रथमच खेळवण्यात येणाऱ्या सुपर १०० दर्जाच्या या स्पर्धेतून पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन यांसारख्या प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली आहे.

अनुभवी सायना दोन आठवडय़ांपूर्वी इंडिया खुल्या स्पर्धेत खेळली होती. तिला युवा मालविका बनसोडने पराभवाचा धक्का दिला. मात्र आता पुन्हा एकदा नव्या दमाने कोर्टवर परतण्यासाठी ३१ वर्षीय सायना उत्सुक आहे. सायनाची पहिल्या फेरीत भारताच्याच स्मित तोश्निवालशी गाठ पडेल. १७ देशांतील ३०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत समावेश नोंदवला असून ३० जानेवारीपर्यंत रंगणारी ही स्पर्धा जवाहरलाल नेहरू बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल. सायनाव्यतिरिक्त आकर्षि कश्यप, अश्मिता छलिहा, मुग्धा आगरे या भारतीय खेळाडूही सहभागी होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरुषांमध्ये ३५ वर्षीय कश्यप प्रमुख आकर्षण असून त्याला सलामीला पात्रता फेरीतील विजेत्याशी झुंजावे लागेल. भारताच्या सौरभ वर्मा, शुभांकर डे, अजय वर्मा यांना अनुक्रमे दुसरे ते चौथे मानांकन लाभले आहे. पुरुष दुहेरीत बी. सुमित रेड्डी आणि मनू अत्री, तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांच्यावर भारताची प्रामुख्याने भिस्त आहे. इंडिया खुली स्पर्धा जिंकणाऱ्या सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी या स्पर्धेतही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.