|| अन्वय सावंत
सामन्याच्या वेळेशी जुळवून घेण्यात खेळाडू अपयशी : कुंटे
मुंबई : गतविजेत्या भारताला यंदाही ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, अमेरिकेविरुद्धचा पहिला डाव जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू गाफील राहिल्यामुळे उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला, असे मत माजी बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले. तसेच अमेरिकेविरुद्धची लढत रात्री उशिराने झाल्याचा खेळाडूंना फटका बसला, असे भारतीय संघाचे न खेळणारे उपकर्णधार अभिजित कुंटे यांनी नमूद केले.

अमेरिकेविरुद्ध उपांत्य फेरीचा पहिला डाव ५-१ असा जिंकण्यात भारताला यश आले. यानंतर मात्र भारताने दुसरा डाव आणि बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेली निर्णायक अतिजलद (ब्लिट्झ) लढत गमावली. याबाबत कुंटे म्हणाले, ‘‘उपांत्य फेरीच्या दुसऱ्या डावात विश्वनाथन आनंद आणि विदित गुजराथी यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे इतर खेळाडूंचाही आत्मविश्वास थोडा कमी झाला. आमचे आधीचे सामने साधारण दुपारच्या वेळेत झाले होते आणि उपांत्य फेरीचे सामने रात्री ९.३० नंतर झाले. या बदलाशी खेळाडूंना जुळवून घेणे अवघड गेले.’’

भारतीय खेळाडूंनी पहिल्या डावातील विजयानंतर अधिक लक्षपूर्वक खेळ करणे गरजेचे होते, असे विश्लेषण ठिपसे यांनी केले. ‘‘अमेरिकेविरुद्ध भारताने पहिला डाव मोठ्या फरकाने जिंकला. त्यानंतर खेळाडू गाफील राहिले. हेच आपल्याला युक्रेनविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतही पाहायला मिळाले होते. यातून भारताने धडा घेणे गरजेचे होते. तसेच सामने उशिरा झाल्याने भारतीय खेळाडूंना पूर्ण लक्ष देऊन खेळता आले नाही. मात्र, भारतीय संघाला जेतेपद राखता न येणे नक्कीच निराशाजनक आहे,’’ असे ठिपसे यांनी सांगितले.

सामन्याच्या वेळेशी जुळवून घेण्यात खेळाडू अपयशी -कुंटे

अमेरिकेविरुद्धची लढत रात्री उशिराने झाल्याचा खेळाडूंना फटका बसला, असे भारतीय संघाचे न खेळणारे उपकर्णधार अभिजित कुंटे यांनी नमूद केले. ‘‘उपांत्य फेरीच्या दुसऱ्या डावात विश्वनाथन आनंद आणि विदित गुजराथी यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे इतर खेळाडूंच्याही आत्मविश्वासावर परिणाम झाला. आमचे आधीचे सामने दुपारच्या वेळेत झाले होते आणि उपांत्य फेरीचे सामने रात्री ९.३० नंतर झाले. या बदलाशी खेळाडूंना जुळवून घेणे अवघड गेले,’’ असे कुंटे यांनी सांगितले.

हरिकाची दिमाखदार कामगिरी, विदितकडून निराशा

भारताला यंदा जेतेपद राखता आले नसले, तरी या संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात यश आले. यंदा भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या कर्णधार आनंदने नऊपैकी चार सामने जिंकले आणि त्याचे चार सामने बरोबरीत सुटले. तसेच द्रोणावल्ली हरिकाने दिमाखदार कामगिरी करताना बाद फेरीतील सर्व (सहा) सामने जिंकले. विदित गुजराथी आणि अनुभवी कोनेरू हम्पी यांना मात्र अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. विदितला आठपैकी दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर त्याचे चार सामने बरोबरीत सुटले.