Jay Shah on Hardik Pandya: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धच्या गट सामन्यादरम्यान घोट्याला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. आता त्याच्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी येथे महिला प्रीमियर लीग-२ लिलावाच्या वेळी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “अफगाणिस्तानविरुद्धच्या मायदेशातील मालिकेआधी तो संघात पुनरागमन करेल. तीन सामन्यांच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-२० मालिकेदरम्यान तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.”
जय शाह पुढे म्हणाले, “आम्ही दररोज हार्दिकवर लक्ष ठेवत आहोत. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. सध्या तो त्याच्या तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेत आहे. तो तंदुरुस्त होताच आम्ही तुम्हाला योग्य वेळी कळवू. अफगाणिस्तान मालिकेपूर्वीही तो फिट असेल. घोट्याच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी २६ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात पुन्हा येणार आहे,” असा खुलासाही बीसीसीआयच्या सचिवांनी केला आहे.
शाह म्हणाले, “तो दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी तयार आहे, तो अद्याप एनसीएमध्ये नाही पण तिथे जाईल. आम्हाला खात्री आहे की तो वेळेत बरा होईल. या मालिकेत शमी आणि पंड्या लवकर परतील अशी आशा सर्वांना होती मात्र, फक्त शमी कसोटी मालिकेत सहभागी होणार आहे.” शमीला घोट्याला दुखापत झाली आहे आणि बीसीसीआयने यापूर्वी सांगितले होते की, “वेगवान गोलंदाज सध्या वैद्यकीय उपचार घेत आहे आणि त्याची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून आहे.”
जय शाह यांनी असेही उघड केले की, “बोर्ड एनसीएमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या तंदुरुस्तीवर देखील देखरेख ठेवत आहे.” विश्वचषकातील पराभवानंतर शाह यांनी दु:ख व्यक्त केले. म्हणाले की, “टीम इंडियाला विश्वचषकात हार्दिक पंड्याची उणीव भासली. तो दुखापतग्रस्त व्हायला नको होता. तो जर अंतिम सामन्यात राहिला असता तर त्याने टीम इंडियाला २८० ते ३०० टप्पा गाठून दिला असता आणि गोलंदाजीत देखील विकेट्स घेतल्या.”
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारपासून (१० डिसेंबर) सुरुवात होणार आहे. उभय संघांमधील पहिला सामना डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया असेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्करामच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या नजरा आफ्रिकन संघाविरुद्धही शानदार कामगिरीवर आहेत.