वृत्तसंस्था, लाहोर

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वक्तव्याचा पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अता तरार यांनी निषेध व्यक्त केला आहे.

पक्तिका प्रांतात झालेल्या हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याबद्दल ‘आयसीसी’, तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दु:ख व्यक्त केले होते. दोघांनी शोकसंदेश प्रसिद्ध करताना पाकिस्तानचा उल्लेख टाळला होता. मात्र, ‘आयसीसी’ने पक्षपातीपणा केला, असे तरार यांचे म्हणणे आहे. ‘‘अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने कुठलीही चौकशी न करता किंवा पुरावे न देता पाकिस्तानच्या हल्ल्याचा उल्लेख केला, तोच मुळात चुकीचा आहे. त्यांनी केलेल्या दाव्याची कोणतीही शहानिशा न करता ‘आयसीसी’ने एका देशाची बाजू घेत या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू पाकिस्तानच्या हल्ल्यात झाल्याचे म्हटले. हे अतिशय चुकीचे आहे. आम्ही ‘आयसीसी’च्या वक्तव्याचा निषेध करतो,’ असे तरार म्हणाले.  विशेष म्हणजे ‘आयसीसी’च्या संदेशानंतर काही तासांनी अध्यक्ष जय शहा यांनीही समाजमाध्यमांचा वापर करत ‘आयसीसी’चे तेच विधान प्रसिद्ध केले. 

अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू रशीद खान आणि गुलबदीन नैब यांनीही या हवाई हल्ल्याचा निषेध करत क्रिकेटपटूंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. यामुळे ‘आयसीसी’च्या स्वतंत्र आणि निष्पक्ष दृष्टिकोन असल्याच्या भूमिकेविषयी आम्हाला शंका वाटते. ज्या हल्ल्याची जबाबदारी कुणीच स्वीकारलेली नाही, अशा घटनेत अशी वादग्रस्त विधाने करणे योग्य नाही, असेही तरार यांचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानच्या जागी झिम्बाब्वे

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगताना अफगाणिस्तानने पाकिस्तानात होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर अफगाणिस्तानची जागा आता झिम्बाब्वे संघ घेईल असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) सांगण्यात आले. श्रीलंका या मालिकेतील तिसरा संघ असेल. ही मालिका १७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.