PAK All Rounder Angry At Fan Video: पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिखार अहमदचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. यामध्ये इफ्तिखारचं बोलणं ऐकून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. रविवारी, १४ जानेवारी रोजी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान एका चाहत्याने इफ्तिखारला ‘चाचू’ म्हणून हाक मारली होती, त्यानंतर सीमारेषेच्या जवळ जाऊन इफ्तिखारने त्याला समज दिली. व्हायरल व्हिडिओमध्ये चाहता त्याला समजावताना दिसत आहे तर इफ्तिखार त्याला उलट उत्तर देत आहे.

केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने कालच्या सामन्यात पाकिस्तानला प्रथम गोलंदाजी करण्याची संधी दिली होती. पहिल्या डावात इफ्तिखार सीमारेषेजवळ उभा असताना ही घटना घडली, पाकिस्तानच्याच एका चाहत्याने त्याला ‘चाचू’ म्हटले. यावरून पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूला राग आला आणि त्याने त्याला “खामोश रेह *** “असं म्हणत फटकारलं. या व्हिडिओमध्ये अस्पष्ट ऐकू येत असलं तरी यावेळी इफ्तिखारने शिवी दिल्याचेही काहींनी म्हटले आहे. यावर चाहत्याने त्याला समजावत अरे “आम्ही तुमचे चाहते आहोत” असे सांगितले तर त्यावर पुन्हा इफ्तिखार अहमद त्याला “मग शांत बस” म्हणत निघून गेला.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड मॅच हायलाईट्स

दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंडने २० षटकांत ८ बाद १९४ धावा केल्या होत्या. फिन ऍलनने ४१ चेंडूत ७५ धावांची शानदार खेळी करत पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य उभे केले. किवीजचा कर्णधार केन विल्यमसन (२५) आणि मिचेल सँटनर (२६) यांना स्वस्तात बाद करताना पाकिस्तानकडून हरिस रौफने तीन तर अब्बास आफ्रिदीने दोन विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज त्याच्या चार स्पेलमध्ये ३० धावा देत विकेटशिवाय राहिला.

हॅमिल्टन येथे झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर पाच सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान सध्या 0-2 ने पिछाडीवर आहे. १९५ धावांचे लक्ष्य असताना मेन इन ग्रीनचा संघ किवींच्या गोलंदाजीपुढे १७३ धावांत गुंडाळला गेला. बाबर आझम (६६) आणि फखर जमान (५०) यांनी अर्धशतके झळकावली. आझम आणि फखर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करून फलंदाजीची लय उत्तम ठेवली होती, तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या १०/२ होती.

हे ही वाचा<< “तेव्हा राग येतो, गिलने अजून..”, रोहित शर्माने शुबमन गिलवर भडकण्याचं सांगितलं कारण; IND vs AFG सामन्याचा Video चर्चेत

शाहीन आफ्रिदीने २२ धावांची खेळी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने चार बळी घेतले तर टीम साऊथी, बीन सियर्स आणि ईश सोधीने प्रत्येकी दोन बळी घेतले. तर सियर्सने बाबर आझमची विकेट घेत यजमानांच्या बाजूने सामना फिरवला.