PAK vs ENG Shoaib Akhtar criticizes Pakistan team : मुलतानमध्ये इंग्लंडकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघाची क्रिकेट विश्वात खिल्ली उडवली जात आहे. शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्ता संघ पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा करूनही कसोटी सामना एका डावाने हरणारा जगातील पहिला संघ ठरला. यजमान संघाने प्रथम फलंदाजी करताना ५५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात जो रूट आणि हॅरी ब्रूक यांच्यातील ४५४ धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने ८२३/७ धावा केल्या. त्यानंतर पाहुण्या संघाने दुसऱ्या डावात पाकिस्तानला २२० धावांत गुंडाळले आणि सामना एक डाव आणि ४७ धावांनी जिंकला. या पराभवानंतर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे.

शोएब अख्तर काय म्हणाला?

पाकिस्तान संघ एकापाठोपाठ एक लाजिरवाणा पराभवाचा सामना करत आहे. प्रथम बांगलादेशने त्यांना मायदेशात पराभूत केले आणि त्यानंतर इंग्लंडकडून पहिल्या कसोटीतही त्यांचा पराभव झाला. पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानी दिग्गजांचा संयम सुटला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लाइव्ह टीव्ही शोमध्ये पाकिस्तान संघावर टीका केली. खेळाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानच्या घरच्या भूमीवर आणखी एका पराभवामुळे संतप्त झालेल्या अख्तर म्हणाला की, गेल्या एक दशकापासून पाकिस्तानच्या क्रिकेटचा दर्जा घसरत आहे. त्याने सध्याच्या खेळाडूंवर टीका करत संघाची स्थिती निराशाजनक असल्याचे सांगितले. पाकिस्तानने कसोटी क्रिकेट खेळणे बंद करावे, असेही तो म्हणाला.

एक दशकांपासून पाकिस्तान संघाचा दर्जा सातत्याने घसरतोय –

पीटीव्ही स्पोर्ट्सवरील थेट चर्चेदरम्यान पाकिस्तान संघावर टीका करत शोएब अख्तर म्हणाला की, ‘जे पेरता, तेच उगवतं. मी एक दशकांपासून पाहतोय संघाचा दर्जा सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती खूपच निराशाजनक आहे. सामना हरणे वाईट गोष्ट नाही, पण सामना घासून व्हायला हवा. यावरून आपला संघ चांगला नाही, हेच दिसून येते. इंग्लंडने तुमच्याविरुद्ध ८०० हून अधिक धावा केल्या आणि बांगलादेशनेही तुमचा पराभव केला.’

हेही वाचा – Rohit Sharma : ‘वेडा झाला आहेस का…’, रोहित शर्मा चाहत्याला असं का म्हणाला? VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानने कसोटी क्रिकेट खेळणे बंद करावे –

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, ‘पाकिस्तानने कसोटी क्रिकेट खेळणे बंद करावे, असे चाहते म्हणत आहेत. मी अशा काही टिप्पण्या पाहिल्या आहेत. पाकिस्तानमध्ये संघ पाठवून त्यांचा कसोटी दर्जा कायम ठेवायचा का, असा प्रश्न आयसीसीला पडला असेल. याचा पाकिस्तान क्रिकेट, चाहते आणि आगामी प्रतिभेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे पीसीबीने ही गोष्ट लवकर हाताळावी अशी माझी इच्छा आहे.