Champions Trophy: आयसीसीची पुढील मोठी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी आहे आणि या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. २०२५ च्या सुरुवातीला खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जोरदार तयारी करत आहे. पण भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता कमी फारच आहे. भारत आणि पाकिस्तानमधील खराब संबंध आणि पाकिस्तानमधील सुरक्षेचा धोका असतानाही पीसीबीला (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) आशा आहे की टीम इंडिया या स्पर्धेसाठी त्यांच्या देशात नक्की येईल. यादरम्यान पीसीबीने भारतीय चाहत्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाहण्यासाठी आपल्या देशात येऊ इच्छिणाऱ्या भारतीय चाहत्यांना त्वरित व्हिसा देण्याचे आश्वासन दिले आहे. नक्वी म्हणाले की, पीसीबीला आशा आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाहण्यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने पाकिस्तानला भेट देतील. भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानात येऊन लाहोरमध्ये भारत-पाकिस्तानमधील हायव्होल्टेज सामना पाहावा, अशी त्यांची इच्छा आहे. एका वृत्तपत्राने नक्वीच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘आम्ही भारतीय चाहत्यांसाठी तिकिटांचा विशेष कोटा ठेवू आणि लवकरात लवकर व्हिसा देण्यासाठी आम्ही योग्य पावले उचलू.’

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे ठिकाण बदलले जाऊ शकते

गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध फारसे चांगले राहिले नाहीत, त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जात नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कप दरम्यान सामने खेळले जातात. अशा स्थितीत ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाऊ शकते, असे मानले जात आहे. असे झाल्यास, टीम इंडिया आपले सर्व गट सामने पाकिस्तानबाहेर खेळेल आणि सेमीफायनलमध्ये पोहोचली तरी ठिकाणामध्ये बदल केले जातील. सध्या दोन्ही उपांत्य फेरीचे सामने पाकिस्तानमध्येच खेळवले जाणार आहेत.

हेही वाचा – Virat Kohli: ४ धावांवर धावबाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, या स्पर्धेचा अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. पण जर टीम इंडिया अंतिम सामन्यात पोहोचली तर अंतिम सामनाही पाकिस्तानबाहेर होऊ शकतो, हा सामना दुबईत होण्याची शक्यता आहे. मात्र, आयसीसीने अद्याप या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्याचवेळी, ड्राफ्ट शेड्यूलनुसार टीम इंडियाला आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळायचे आहेत.