१४ वेळा विजेत्या इंडोनेशियाचा ३-० असा धुव्वा उडवत थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडिमटपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ७३ वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पहिलेच विजेतेपद होते. आज सकाळी दिल्लीमध्ये थॉमस कप विजेते तसंच टीममधील इतर सहकारी यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, यावेळी मोदी यांनी विजेत्या टीमचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी उबेर कपमधील महिला सदस्यांनीही मोदी यांची भेट घेतली.

” होय, आम्ही करु शकतो… हा सकारात्मक दृष्टीकोन देशाचे बलस्थान बनला आहे. मी बॅडमिंटनपटूंना खात्रीपूर्वक सांगतो की सरकार सर्व प्रकारे शक्य होईल ती मदत तुम्हाला करेल. मी टीममधील सर्वांचे देशवासियांच्या वतीने अभिनंदन करतो. या स्पर्धेचे नाव अनेकांना माहितीही नाहीये. तुमचा विजय ही काही छोटी घटना नाहीये” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

यानिमित्ताने थॉमस कप विजेत्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या श्रीकांत किदम्बीने संघाची सकारात्मर भुमिका, त्यावेळी असलेली मानिसकता यावर प्रकाश टाकला.” टीममधील सर्व सदस्य चांगले खेळतच होते, माझं लक्ष्य होतं या सर्वांना एकत्र आणणे कारण ही एक स्पर्धा होती, टीमचे एकत्रित कौशल्य अपेक्षित होते, टीमने एकसंध खेळणे आवश्यक होते. आम्ही प्रत्येक खेळाच्या वेळी छोट्या छोट्या व्यूहात्मक चाली रचल्या, लक्ष्य निश्चित केले. मला संघाचं लिडर म्हणून फारसं काम करावं लागलं नाही कारण सर्वजण चांगला खेळ करत होते”.

“मी या टीमचे नेतृत्व केले आणि निर्णायक अशा अंतिम सामन्यात मी खेळण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. देशाचे प्रतिनिधीत्व करणे ही एक मोठी संधी होती आणि मला सर्वोत्तम खेळ करायचा होता” अशा शब्दात किदम्बीने आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान थॉमस कप विजेत्या टीमचे विजयानंतर फोनवरुन अभिनंदन करतांना टीममधील सदस्य असलेल्या उत्तराखंडच्या लक्ष्य सेनकडे विजयाचा आनंद म्हणून अल्मोडा बाल मिठाई आता द्यावी अशी मागणी मोदी यानी केली होती. तेव्हा आज भेटी दरम्यान लक्ष्य सेन याने मिठाईचा एक छोटा बॉक्स मोदी यांना दिला. तेव्हा याबद्दल मोदी यांनी लक्ष्य सेन याला आवर्जून धन्यवाद दिले.