Vaibhav Suryavanshi And PM Modi At Patana Airport: बिहारच्या पाटणा विमानतळावर आज युवा क्रिकेटपटून वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्या एक्स हँडलवर याबद्दल माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वीच वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले की, ‘पाटणा विमानतळावर युवा क्रिकेट सेन्सेशन वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाला भेटलो. त्यांच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे! त्याच्या भविष्यातील क्रिकेट कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले होते. रविवार, ४ मे रोजी बिहारमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स सुरू झाल्याची घोषणा करताना ते म्हणाले होते की, ‘मी बिहारचा सुपूत्र वैभव सूर्यवंशीची आयपीएलमधील कामगिरी पाहिली. वैभवने इतक्या लहान वयात इतका मोठा विक्रम केला. वैभवच्या कामगिरीमागे कठोर परिश्रम आहेत.’
१४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी यंदा त्याचा आयपीएलचा पहिला हंगाम खेळत आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे सध्या देशभरात त्याच्या कौशल्याचे कौतुक होत आहे.
सात डावांमध्ये ३६ च्या सरासरीने धावा
दरम्यान वैभवला आयपीएलच्या सात सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. यशस्वी जैस्वालसह राजस्थानकडून सलामीला फलंदाजी करताना त्याने सात डावांमध्ये ३६.०० च्या सरासरीने २५२ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट २०६.५५ इतका होता. याचबरोबर त्याने एक शतक आणि एक अर्धशतकही झळकावले आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक आणि शतक झळकावण्याचा विक्रमही वैभवने आपल्या नावे केला आहे.
वैभवचा विश्वविक्रम
आयपीएलमध्ये २९ एप्रिल रोजी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये ऐतिहासिक खेळी केली होती. त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावत विश्व विक्रम केला होता. त्याचे हे शतक फक्त आयपीएलच नव्हे तर जागतिक टी-२० क्रिकेटमधील वेगवान शतक होते. वैभव सूर्यवंशीच्या या शतकाच्या जोरावर त्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर मोठा विजय मिळवला होता.