scorecardresearch

अहमदाबाद कसोटी सामन्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त; ‘असा’ असेल PM नरेंद्र मोदींचा दौरा, मेट्रोच्या वेळापत्रकातही केले बदल

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यासाठी मेट्रोचं वेळापत्रक आणि फ्रिक्वेंसी दोन्ही बदलण्यात आले आहेत.

PM Narendra Modi Visit In Gujrat
पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या खेळाडूंची भेट घेणार. (Image-Indian Express)

India Vs Australia Test : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा चौथा सामना अहमदाबादमध्ये ९ मार्चला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने आघाडी घेतली आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अॅंथनी अल्बनीजही अहमदाबादला पोहोचणार आहेत. दोन्ही दिग्गज नेत्यांसाठी स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. स्टेडियमच्या बाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यासाठी मेट्रोचं वेळापत्रक आणि फ्रिक्वेंसी दोन्ही बदलण्यात आले आहेत. ९ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचा दौरा करणार आहे आणि कसोटी सामनाही पाहणार आहेत. अशा परिस्थितीत मेट्रोच्या वेळापत्रकात ९ ते १३ मार्चमध्ये बदल करण्यात आला आहे. ९ मार्चला मेट्रो सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. याचसोबत १२ मिनिटांची फ्रिक्वेंसी सेट करण्यात आली आहे. म्हणजे प्रत्येक १२ मिनिटात तुम्हाला मेट्रो मिळू शकते. याशिवाय १० ते १३ मार्च दरम्यान मेट्रोचं टायमिंग सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत ठेवण्यात आलं आहे. यादिवशीही फ्रिक्वेंसी वाढवून १२ मिनिटं केली आहे.

नक्की वाचा – चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये होणार मोठे बदल? सूर्या तळपणार? ‘असं’ असेल समीकरण

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरक्षा वाढवली

सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस आधी ८ मार्चला रात्री १० वाजताच्या सुमारास अहमदाबादला पोहोचतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी गव्हर्नर हाऊसमध्ये राहतील. तर ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्रीही ८ मार्चलाच अहमदाबादला पोहोचतील. दोन्ही प्रधानमंत्री ९ तारखेला सकाळी ८ वाजताच्या सुमारास स्टेडियममध्ये पोहोचतील. सामना सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी आणि अॅंथनी दोघेही संघातील खेळाडूंची भेट घेतील. इथे दोन्हीही प्रधानमंत्री जवळपास २ तासांपर्यंत म्हणजेच दहा ते साडेदहापर्यंत थांबतील. दोघेही सामना पाहण्यासोबतच समालोचनही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर मोदी स्टेडियमधून राजभवनकडे रवाना होतील. तर दुपारी २ वाजता दिल्लीला रवाना होतील.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 14:45 IST
ताज्या बातम्या