एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा महिला संघ हा अखंड भारताचे प्रतिबिंब असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. विश्वविजेत्या भारतीय महिला संघाने गुरुवारी राष्ट्रपती भवनात मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी संघातील मुलींशी संवाद साधला.
‘‘संघामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांचे, सामाजिक पार्श्वभूमी, परिस्थिती आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुली होत्या. मात्र, त्या सर्व एक संघ म्हणून खेळल्या. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली. त्या अखंड भारताचे प्रतिबिंबच ठरतात,’’ असे मुर्मू म्हणाल्या.
‘‘उपांत्य फेरीत सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर मात करताना त्यांनी त्यांच्या क्षमतेवरील विश्वास बळकट केला. तरुण पिढी, विशेषत: मुली या विजेतेपदाने केवळ खेळाच्याच मैदानात नाही, तर जीवनातही पुढे जाण्यासाठी प्रेरित होतील,’’ असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी मुलींच्या मानसिकतेचेही कौतुक केले. ‘‘विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत एकवेळ त्यांची झोपही उडाली असेल. मात्र, त्या डगमगल्या नाहीत. समोर आलेल्या प्रत्येक आव्हानावर त्यांनी मात केली. आमच्या मुलीच जिंकतील हा जनतेचा दृढ विश्वास त्यांनी आपल्या अजोड कामगिरीने सार्थ ठरवला,’’ असे मुर्मू यांनी नमूद केले.
या वेळी भारतीय महिला संघाच्या वतीने सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी कर्णधार हरमनप्रीत कौर हिने राष्ट्रपती मुर्मू यांना प्रदान केली. त्यांनी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या चमूसह एकत्रित छायाचित्रही काढले.
