राष्ट्रीय, आशियाई, जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केल्यावर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकार आपल्या खेळाडूंना रोख पारितोषिके आणि शासकीय नोकऱ्या देते, पण बऱ्याचदा लालफितीच्या कारभारचा फटका खेळाडूंना बसून त्यांचे नुकसान होते. याचे ताजे उदाहरण म्हणजे शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर. जागतिक स्पर्धामध्ये पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान पटकावूनही सुहासला अजूनही प्रथम श्रेणीची बढती देण्यात आलेली नाही. गेले वर्षभर सुहास मंत्रालयाच्या फेऱ्या मारून जोडे झिजवत असला तरी आतापर्यंत त्याच्या पदरी फक्त निराशाच पडली आहे.
सुहासने ‘मि.आशिया’ हा किताब जिंकल्यावर त्याला सरकारने महसूल खात्यामध्ये द्वितीय श्रेणीची (नायब तहसीलदार) नोकरी दिली होती. त्यानंतर २०१२मध्ये सुहासने ‘मि. ऑलिम्पिया’ स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले, तर याच वर्षी ‘मि. युनिव्हर्स’ स्पर्धेत त्याने कांस्यपदकाला गवसणी घातली. जागतिक स्तरावर दर्जेदार कामगिरी करणाऱ्या या देशातील अव्वल खेळाडूचा राज्य शासनाकडून योग्य सन्मान झाला नाही. नोकरीमध्ये बढतीही मिळालेली नाही.
 अन्य राज्यांमध्ये आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा सत्कार करण्यात येतो. अन्य राज्यांमध्ये आशिया स्तरावर विजेतेपद मिळवल्यास खेळाडूला थेट प्रथम श्रेणीची नोकरी देण्यात येते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सुहासला मात्र प्रथम श्रेणीसाठी झगडावे लागत आहे. अन्य राज्यांतून सुहासला प्रतिनिधित्वासाठी आमंत्रण दिले जात आहे, पण ‘महाराष्ट्र सोडणार नाही,’ असा मराठी बाणा त्याने दाखवला आहे. परंतु पदरात मात्र त्याच्या काहीही पडलेले नाही. अन्य राज्यांमध्ये खेळाडूंनी फक्त खेळाकडे लक्ष द्यावे, त्यांची सर्व तजवीज राज्य सरकार काहीही न सांगता करत असते, पण सुहाससारख्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची राज्य सरकारने मात्र थट्टा मांडल्याचे निदर्शनास येत आहे.
 सुहासकडे शिक्षणाची शिदोरी नाही असेही नाही, त्याने वाणिज्य शाखेतून पदवी मिळवलेली आहे. सर्व निकष त्याने पूर्ण केलेले आहेत, पण सुहास खामकर नक्की कोण, कोणते खेळ खेळतो, किती पदके जिंकला आहे, याबद्दल राज्याचे मुख्य सचिव अनभिज्ञ आहेत. सुहास हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील युवा पिढीसाठी आदर्श शरीरसौष्ठवपटू आहे, जर त्याला अशा प्रकारे सरकारदरबारी जोडे झिजवावे लागत असतील तर युवा खेळाडू या खेळाकडे वळणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या सुहासला न्याय देऊन हक्काची प्रथम श्रेणीची नोकरी द्यावी, अशी आशा शरीरसौष्ठवप्रेमी व्यक्त करीत आहेत.