गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत भन्नाट पुनरागमन करणारा राफेल नदाल आणि घरच्या मैदानावर जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झालेल्या सेरेना विल्यम्सने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.
फ्रेंच खुल्या स्पर्धेत सातव्यांदा अधिराज्य गाजवणाऱ्या नदालला विम्बल्डन स्पर्धेत अनपेक्षितरीत्या दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र त्यानंतर आपल्या खेळातील त्रुटींचा अभ्यास करून नदालने मॉन्ट्रेअल आणि सिनसिनाटी स्पर्धाची जेतेपदे पटकावली. वर्षांतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या द्वितीय मानांकित नदालने अमेरिकेच्या रायन हॅरिसनवर ६-४, ६-२, ६-२ असा विजय मिळवला. हार्ड कोर्टवरचा नदालचा या वर्षांतील हा सोळावा विजय आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे नदालला या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. पुनरागमन केल्यानंतर नदालची कामगिरी ५४-३ अशी आहे.
‘‘न्यूयॉर्कमध्ये खेळण्याचा आनंद अनोखा आहे. इथले वातावरणच वेगळे असते. सामन्यापूर्वी माझ्यावर थोडे दडपण होते. परंतु जिंकत असल्याने असे दडपण पुढच्या सामन्यापूर्वीही राहिल्यास काळजी नाही,’’ असे नदालने सांगितले.
नदालचा मित्र स्पेनच्या डेव्हिड फेररने ऑस्ट्रेलियाच्या निक कायरिगिओसचा ७-५, ६-३, ६-२ असा पराभव केला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत दाखल झालेल्या ब्रिटनच्या डॅनियल इव्हान्सने जपानच्या ११व्या मानांकित केई निशिकोरीला ६-४, ६-४, ६-२ असे नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली.
दरम्यान, महिलांमध्ये चार वेळा अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाने अवघ्या तासाभरात फ्रान्सेस्का शियोव्हेनचे आव्हान ६-०, ६-१ असे सहज संपुष्टात आणले. अव्वल मानांकित सेरेनाने शियोव्हेनची सव्‍‌र्हिस सहा वेळा भेदत वर्चस्व गाजवले.  
‘‘प्रत्येक सामना गांभीर्याने घेण्याचे मी ठरवले आहे. शियोव्हेन माजी ग्रँडस्लॅम विजेती आहे,’’ असे सेरेनाने सांगितले.
सेरेनाची बहीण आणि या स्पर्धेची माजी विजेती असलेल्या व्हीनस विल्यम्सनेही आपल्या मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. २००० आणि २००१ साली या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या व्हीनसने बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेन्सवर ६-१, ६-२ अशी मात केली.
पोलंडच्या अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने स्पेनच्या सिल्व्हिया सोलर-इस्पिनोसाचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवत दुसऱ्या फेरीत
आगेकूच केली. चीनच्या लि नाने बेलारुसच्या ओल्गा गोव्हटरेसोव्हावर ६-२, ६-२ असा विजय मिळवला. २६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मानांकन मिळालेली ब्रिटिश टेनिसपटू लॉरा रॉबसनने स्पेनच्या अनुभवी लौड्रेस डॉम्निग्युझ लिनोला ७-५, ६-० असे नमवले.