Rahul Dravid Congratulate Rohit Sharma After Stand Unveil: मुंबईतील आयकॉनिक वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा राजा रोहित शर्माच्या नावाचं स्टँड आता पाहायला मिळणार आहे. वानखेडेवर १६ मे रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात रोहित शर्माच्या स्टँडच्या अनावरण करण्यात आलं. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना दिग्गज क्रिकेटपटूंबरोबर आता रोहितच्या नावाचं स्टँडदेखील वानखेडे स्टेडियममध्ये असणार आहे. रोहितच्या नावाच्या स्टँडच्या अनावरणानंतर त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण राहुल द्रविड यांच्या शुभेच्छांनी सर्वांचं लक्ष वेधलं.

रोहित शर्माचं वानखेडे स्टेडियमशी असलेलं नातं खूप खास आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याने या मैदानावर अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. त्याच्या बॅटमधून आलेल्या षटकारांनी चाहत्यांची मनं जिंकलीच पण क्रिकेटप्रेमींसाठी हे स्टेडियम आणखी संस्मरणीय बनवले. रोहितला मिळालेला हा सन्मान त्याच्या मुंबई आणि भारतीय क्रिकेटप्रति समर्पणाचे प्रतीक आहे.

राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असताना त्यांचं आणि रोहितचं बॉन्डिंग कमालीचं होतं. दरम्यान आता राहुल द्रविड यांनी रोहितला विनोद करत शुभेच्छा दिल्या आहेत. द्रविड तो गमतीने म्हणाले, “अरे रोहित, असं वाटतंय की तू त्या स्टँडमध्ये इतके षटकार मारले आहेस की त्या स्टँडला तुझंच नाव द्यावं लागलं! पण खूप खूप अभिनंदन.” असं हसत हसत द्रविड यांनी बोलायला सुरूवात केली.

“मला खात्री आहे की लहानपणी तू या वानखेडेसारख्या प्रतिष्ठित स्टेडियममध्ये खेळण्याचं स्वप्न पाहिलं असशील. वानखेडेसारख्या जागतिक दर्जाच्या स्टेडियममध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि रोहित, तू तिथे खेळलासच नाही तर असंख्य संस्मरणीय खेळी खेळून ते अधिक खास बनवलंस. पण एके दिवशी या स्टेडियममधील एका स्टँडला तुमचे नाव दिले जाईल, असा विचारही तू कधी केला नसशील. मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील तुझ्या योगदानाचं हे खरे बक्षीस आहे आणि यासाठी तू खरोखरच तू पात्र आहेस”, असं द्रविड पुढे म्हणाले.

द्रविड पुढे म्हणाले, “खूप खूप शुभेच्छा. कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह तुझ्यासाठी हा एक खास दिवस होता. तू सामना खेळताना रोहित शर्मा स्टँन्डमध्ये षटकार मारताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे आणि आता तुझ्या नावाचं स्टँड आहे, त्यामुळे पुढे मुंबईत जेव्हा मला तिकिट कमी पडतील, तेव्हा कोणाशी संपर्क साधायचा हे मला माहितीय”, अशा विनोदी अंदाजात रोहितला द्रविड यांनी शुभेच्छा दिल्या.

रोहित शर्मा आता येत्या २१ मे रोजी आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्यात वानखेडे स्टेडियमवर खेळताना दिसणार आहे.