Rahul Dravid’s reaction to Virat Kohli 500th international Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघांत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खास असणार आहे. तो मैदानात उतरताच एक नवीन विक्रम करेल. कारण हा त्याच्या कारकिर्दीतील कारकिर्दीतील ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. या खास प्रसंगी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कोहलीचे कौतुक केले आणि सांगितले की, हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे, ज्यामुळे तो इथपर्यंत पोहोचू शकला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयने राहुल द्रविड आणि विराट कोहलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये द्रविड म्हणाला की, “हा त्याचा ५०० वा सामना आहे, हे मला माहीत नव्हते. मी संख्येच्या बाबतीत चांगला नाही. हे ऐकून खूप छान वाटतं आणि तो सर्व खेळाडूंसाठी प्रेरणास्थानापेक्षा कमी नाही, मग ते संघातील खेळाडू असोत किंवा ज्यांना या खेळात आपले भविष्य देशात घडवायचे आहे.”

विराट कोहलीचे आकडे आणि विक्रम त्याच्याबद्दल सर्व सांगतात – राहुल द्रविड

राहुल द्रविड पुढे म्हणाला की, “विराट कोहलीचे आकडे आणि विक्रम त्याच्याबद्दल सर्व काही सांगतात. पडद्यामागे कोहली सतत जी मेहनत घेतो, ते फक्त मीच समजू शकतो. याच कारणामुळे आज तो ५०० वा सामना गाठू शकला आहे. तुम्हाला ते सहजासहजी मिळत नाही. यासाठी तुम्हाला सतत मेहनत करावी लागेल. त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहणे खूप छान होते. जेव्हा मी खेळायचो आणि तो संघात आला तेव्हा तो तरुण खेळाडू होता. गेल्या १८ महिन्यांत मला त्याला वैयक्तिकरित्या जाणून घेण्याची संधी मिळाली. हे खूप मस्त होतं. कोहलीकडूनही मी खूप काही शिकलो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोहली जागतिक क्रिकेटमधील १० वा खेळाडू ठरणार –

पाचशे किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम करणारा विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील १० वा खेळाडू ठरणार आहे. याशिवाय आतापर्यंत खेळलेल्या ४९९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराटने ५३.४८च्या सरासरीने एकूण २५४६१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची ७५ शतकेही आहेत. सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या, रिकी पाँटिंग, महेंद्रसिंग धोनी, शाहिद आफ्रिदी, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड या खेळाडूंनी आतापर्यंत ५०० सामने खेळले आहेत.