प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत ज्याप्रमाणे संघाच्या सर्वसाधारण कामगिरीचं खापर मॅनेजरवर फोडलं जातं त्याचप्रमाणे राजस्थानच्या कामगिरीसाठी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जबाबदार ठरवून त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचा दावा एबी डी’व्हिलियर्सने केला आहे.

२०२५ हंगामात राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक होते. राजस्थानचा संघ बादफेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यांना आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. द्रविड यांना संघटनात्मक रचनेत मोठ्या भूमिकेचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही असं राजस्थान रॉयल्सने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘हा राजस्थान रॉयल्सच्या मालकांचा निर्णय वाटतो. व्यवस्थापनाचा निर्णय वाटतो. त्यांनी द्रविडसमोर मोठ्या भूमिकेचा प्रस्ताव ठेवला, तो त्याने नाकारला. तो कदाचित नाराज असू शकतो. राहुल हा महान खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा अनेक युवा खेळाडूंना झाला आहे. त्याचं क्रिकेटचं ज्ञान अफाट आहे. आमच्या खेळावर, वागण्यावर द्रविड यांचा मोठा प्रभाव आहे असं अनेक युवा खेळाडूंनी मला सांगितलं’, असं एबीने सांगितलं.

द्रविडच्या मार्गदर्शनातच भारतीय संघाने गेल्या वर्षी टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. असं असूनही द्रविड यांची उचलबांगडी झाली. ‘प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत असंच होतं. संघाच्या सुमार कामगिरीसाठी प्रशिक्षकांना जबाबदार धरलं जातं. संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक प्रचंड दडपणाखाली असतात. कामगिरी खालावली की प्रशिक्षकांना मालकाकडून ऐकावं लागतं. आपल्याला नेमकं काय झालंय माहिती नाही. पण द्रविडने मोठ्या भूमिकेला नकार दिला आहे. कदाचित त्याची उचलबांगडी करण्यात आली असावी. असं झालं असेल तर हे योग्य नाही. आगामी हंगामासाठी राजस्थानने वेगळ्या पद्धतीने विचार केला आहे असं दिसतं. त्यांना कर्णधार, प्रशिक्षक यासंदर्भात नव्याने संरचना करायची असू शकते’, असं एबीने म्हटलं आहे.

राजस्थानच्या लिलावातील निर्णयावरही एबीने टीका केली. तो म्हणाला, ‘मोठ्या खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय अनाकलनीय होता. राजस्थानने जोस बटलरसारख्या अनुभवी शिलेदाराला रिलीज केलं. बटलरच्या बरोबरीने राजस्थानने रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट यांना रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता’.

या हंगामादरम्यान कर्णधार संजू सॅमसन हाताला झालेल्या दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही. दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने संजूला इम्पॅक्ट सब म्हणून खेळवण्यात आलं. तो विशेषज्ञ कर्णधार म्हणून खेळला. संजूच्या अनुपस्थितीत रायन परागने संघाचं नेतृत्व केलं. रायनकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्याने माजी खेळाडू, तज्ज्ञांनी तसंच चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. हंगामाअखेर संजू रॉयल्सचा निरोप घेणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. राजस्थान रॉयल्स तसंच संजूने यासंदर्भात कोणतीही औपचारिक घोषणा केली नाही. चेन्नई सुपर किंग्सचा संघ संजूला ताफ्यात दाखल करण्यासाठी सज्ज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सनेही यासंदर्भात काहीही भाष्य केलेलं नाही.