Rajeev Shukla New BCCI President: बीसीसीआयचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि विद्यमान उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्षपद येणार आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांना वयोमर्यादेच्या नियमामुळे राजीनामा द्यावा लागणार आहे. राजीव शुक्ला त्यांच्याकडून लवकरच पदभार स्वीकारतील. तसेच अध्यक्षपदाची पुढील निवडणूक सप्टेंबर २०२५ मध्ये होणार असून शुक्ला तीन महिने या पदावर असतील.
रॉजर बिन्नी हे १९ जुलै रोजी ७० वर्षांचे होत आहेत. ७० वर्षांचे वय झाल्यानंतर तिला किंवा त्याला कोणतेही पद धारण करता येत नाही, असा बीसीसीआयचा नियम आहे. या नियमाअंतर्गत आता रॉजर बिन्नी यांना हे पद सोडावे लागणार आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार, अध्यक्ष उपलब्ध नसताना त्याच्याजागी विद्यमान उपाध्यक्ष या पदाचा अंतरिम कार्यभार सांभाळतील. तसेच परिषदेने सर्वसाधारण सभेत अंतरिम अध्यक्षांना दिलेली कार्ये आणि जबाबदाऱ्याही राजीव शुक्ला यांना पार पाडाव्या लागणार आहेत.
बीसीसीआयमध्ये मागच्या वर्षीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडले होते. त्यांच्याजागी तत्कालीन सहसचिव देवाजित साकिया यांनी सचिव पदाचा अंतरिम कार्यभार सांभाळला होता.
कोण आहेत राजीव शुक्ला?
राजीव शुक्ला हे काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. बीसीसीआयमध्ये अनेक वर्षांपासून ते प्रशासक म्हणून काम करत आहेत. मुळचे पत्रकार असलेले राजीव शुक्ला राजकारणात आले आणि त्यानंतर अनेक वर्षांपासून त्यांचा क्रिकेट बोर्डाशी संबंध राहिला आहे. ६५ वर्षांचे राजीव शुक्ला हे २०११ ते २०१७ या काळात आयपीएलचे कमिशनरही होते. २०२० साली शुक्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले. तसेच २०२२ सालीही त्यांची या पदावर निवड झाली होती.