Ranji Trophy 2025 Live Streaming Details in Marathi: भारतातील सर्वात मोठी प्रथम श्रेणी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा २०२५-२६ हंगाम बुधवार, १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत एकूण ३८ संघ सहभागी होतील, ज्यामध्ये एलिट विभागात ३२ संघ आणि प्लेट गटात सहा संघ असणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने लाईव्ह कुठे पाहता येणार, हे जाणून घेऊया.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एकूण १९ सामने खेळवले जातील. या हंगामात दोन भागात १३८ सामने खेळले जाणार आहेत. गतविजेता विदर्भ आपल्या हंगामाची सुरूवात नागालँडविरुद्ध सामन्याने करेल. तर मुंबईचा सामना जम्मू आणि काश्मीरविरूद्ध असणार आहे, तर गेल्या हंगामातील उपविजेता केरळचा पहिला सामना महाराष्ट्राविरूद्ध होईल.

नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली खेळणार चॅम्पियन मुंबईचा संघ

विक्रमी ४२ वेळा रणजी चषक स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा मुंबई संघ या हंगामात नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली खेळणार आहे. २०२५-२६ हंगामात शार्दुल ठाकूर मुंबईच्या संघाचं नेतृत्त्व करणार आहे. गेल्या हंगामात उपांत्य फेरीत गतविजेत्या आणि इराणी कप विजेत्या विदर्भकडून पराभव पत्करल्यानंतर, मुंबई संघ या हंगामात पुन्हा आपले वर्चस्व राखण्यासाठी उत्सुक असेल. माजी कर्णधार अजिंक्य रहाणेदेखील या संघाचा भाग आहे.

भारताच्या या स्टार खेळाडूंवर रणजी ट्रॉफीत असणार नजरा

रणजी ट्रॉफी हंगामात इशान किशन, रजत पाटीदार, अभिमन्यू ईश्वरन आणि पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. शिवाय, हर्ष दुबे, उमरान मलिक, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी सारख्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मुंबईकडून पूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा पृथ्वी शॉ या हंगामात महाराष्ट्राकडून खेळणार आहे. करुण नायर त्याच्या माजी संघाकडून कर्नाटकमधून खेळेल.

रणजी ट्रॉफी सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येतील. तर मोबाईलवर जिओ हॉटस्टार अॅपवर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग असणार आहे. तर सर्व सामने भारतात विविध ठिकाणी खेळवले जातील आणि हे सामने सकाळी ८.१५ वाजता सुरू होतील.