Ranji Trophy 2025 Maharashtra vs Kerala: रणजी ट्रॉफी २०२५ मधील सामन्यांना सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंवर नजरा असणार आहेत. रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगाम बुधवार, १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र संघाचा पहिला सामना केरळ संघाविरूद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात महाराष्ट्राची सुरूवात खराब झाली आहे. मुंबईतून महाराष्ट्र संघात गेलेला पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला आहे.

महाराष्ट्र आणि केरळ यांच्यातील सामना तिरूवनंतपुरम येथे खेळवला जात असून या सामन्याची नाणेफेक केरळने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केरळसाठी हा निर्णय अगदी योग्य ठरला. कारण महाराष्ट्र संघाने ४ षटकांत ५ धावा करत ४ विकेट्स गमावले आहेत. केरळच्या दोन गोलंदाजांपुढे अक्षरश: महाराष्ट्र संघाने गुडघे टेकले आहेत.

आश्चर्य म्हणजे एकाही फलंदाजाने अद्याप खातंही उघडलेलं नाही. बाद झालेल्या चारपैकी एकाही फलंदाजाने खातं उघडलं नाही. महाराष्ट्र संघाचा नवा सलामीवीर पृथ्वी शॉ चार चेंडूत शून्यावर बाद झाला, तर अर्शीन कुलकर्णी व सिद्धेश वीर गोल्डन डकवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार अंकित बावणे ७ चेंडूत खातं न उघडता बाद झाला.

झटपट ४ विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि सौरभ नवले यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण चांगल्या सुरूवातीनंतर सौरभ नवलेदेखील बाद झाला आहे. ऋतुराजबरोबर आता मैदानात जलज सक्सेना फलंदाजीला आला आहे. यासह महाराष्ट्राने १२ षटकांत ५ बाद २६ धावा केल्या आहेत. केरळकडून एम डी निधीश याने ३ विकेट्स तर नेदुमनकुझी बेसिल याने २ विकेट्स घेतल्या आहेत.

महाराष्ट्राचा संघ

अंकित बावणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, सौरभ नवले (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, रजनीश गुरबानी, विकी ओस्तवाल, सिद्धेश वीर, मुकेश चौधरी, अर्शीन कुलकर्णी, रामकृष्ण घोष

केरळचा संघ

मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार व यष्टीरक्षक), बाबा अपराजित, संजू सॅमसन, सचिन बेबी, एमडी निधीश, अक्षय चंद्रन, रोहन कुन्नम्मल, अंकित शर्मा, ईडन ऍपल टॉम, नेदुमनकुझी बेसिल, सलमान निझार