बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीकडून आज सहा जणांच्या मुलाखती
भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सोमवारी क्रिकेट सल्लागार समिती सहा उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून या पदासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री हे या शर्यतीत मुख्य दावेदार असल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसीआयकडे प्रशिक्षकपदासाठी एकूण १० अर्ज आले होते. त्यामध्ये शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, दोड्डा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्लुसनर, फिल सिमन्स, राकेश शर्मा आणि उपेंद्रनाथ भट्टाचार्य यांचा समावेश आहे. या १० जणांमधून शास्त्री, सेहवाग, मूडी, राजपूत, सिमन्स आणि पायबस या सहा जणांच्या मुलाखती सल्लागार समिती घेणार आहे. क्लुसनरच्या नावाचा गांभीर्याने विचार केला गेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अनिल कुंबळे आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. इंग्लंडमधील चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा संपल्यावर कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवायला सुरुवात केली. सुरुवातीला शास्त्री यांनी या पदासाठी अर्ज केला नव्हता, पण ही मुदत ९ जुलैपर्यंत वाढवल्यावर शास्त्री यांनी लगेच ही संधी साधली.
शास्त्री यांनी यापूर्वी संघाचे संचालकपद यशस्वीरीत्या सांभाळले आहे. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने २०११च्या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली होती. त्याचबरोबर कोहलीबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळेच शास्त्री हे प्रशिक्षकपदासाठी प्रमुख दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे सल्लागार समितीमधील भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि शास्त्री यांच्यात गेल्या वर्षी मुलाखतीनंतर वाद-विवाद झाला होता. कारण शास्त्री यांनी ‘स्काइप’द्वारे प्रशिक्षकपदासाठी मुलाखत दिली होती आणि त्या वेळी गांगुली हजर नव्हता. प्रशिक्षकाच्या मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहायला हवे, अशी टिप्पणी गांगुलीने केली होती. त्यामुळे या वेळी शास्त्री हे मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार का आणि ते उपस्थित राहिले नाहीत तर त्यांची मुलाखत वैध समजली जाणार का, हादेखील प्रश्न आहे. पण सध्याच्या घडीला कोहलीच्या आवडीचा प्रशिक्षक नेमावा, असे सल्लागार समितीने ठरवले तर शास्त्री यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. शास्त्री जर मुख्य प्रशिक्षक झाले तर साहाय्यक प्रशिक्षकांमध्ये जास्त बदल होणार नाहीत, असे समजले जात आहे.
भारताचा तडफदार सलामीवीर सेहवागकडे प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव नाही. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे मार्गदर्शकपद त्यांच्याकडे आहे. पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा राजपूत हे संघाचे व्यवस्थापक होते. त्यानंतर आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांच्या ताफ्यातही त्यांचा समावेश होता. सध्याच्या घडीला ते अफगाणिस्तानचे प्रशिक्षकपद भूषवत आहेत.
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मूडी यांनी यापूर्वी श्रीलंकेचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेने २०११च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक भूषवत आहेत, त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीत संघाने जेतेपदाला गवसणी घातली आहे. जर मूडी हे प्रशिक्षकपदी नियुक्त झाले तर गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडरमॉट यांची निवड होऊ शकते. सिमन्स यांच्याकडे अफगाणिस्तान आणि आर्यलडसारख्या संघाना प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे.