Ravindra Jadeja: भारताचा इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. या दोन दिग्गजांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढचा नंबर कोणाचा? तर रवींद्र जडेजाचं नाव चर्चेत होतं. विराट- रोहितआधी अश्विननेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवृत्तीची घोषणा केली होती. मग जडेजानेही आता निवृत्त व्हावं असं काहींचं म्हणणं होतं. पण जडेजाने आपल्या कामगिरीने सर्वांची बोलती बंद केली आहे. गेल्या २ सामन्यातील चारही डावात त्याने अर्धशतकं झळकावली आहेत. एका अष्टपैलू खेळाडूकडून ज्या अपेक्षा असतात, त्या पलीकडे जाऊन जडेजाने संघासाठी योगदान दिलं आहे. हा सामना जरी भारताने गमावला असला, तरी जडेजाच्या संघर्षापुढे इंग्लंडला गुडघे टेकावे लागले आहे.
सलग ४ डावात ४ अर्धशतकं
रवींद्र जडेजा हा गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात मोलाचं योगदान देत असतो. इंग्लंडमध्ये त्याला गोलंदाजीत आपली छाप सोडता आलेली नाही. पण फलंदाजीत जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्याने संधीचं सोनं केलं आहे. एजबस्टन कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने ८९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तो ६९ धावांवर नाबाद राहिला.आता लॉर्ड्स कसोटीतील पहिल्या डावात त्याने ७२ धावा चोपल्या. या सामन्यातील दुसऱ्या डावात केलेली खेळी ही क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा जेव्हा लॉर्ड्स कसोटीचा उल्लेख केला जाईल तेव्हा जडेजाच्या या झुंजार खेळीचा आवर्जुन उल्लेख केला जाईल.
रवींद्र जडेजा या डावात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ज्यावेळी जडेजा फलंदाजी करत होता त्यावेळी केएल राहुल स्ट्राईकवर होता. दोघं मिळून भारतीय संघाला विजय मिळवून देतील असं वाटलं होतं. पण बेन स्टोक्सच्या आत येणाऱ्या चेंडूवर केएल राहुलची विकेट पडली. केएल राहुल पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरही विकेट फेकून तंबूत परतला. संपूर्ण जबाबदारी नितीश कुमार रेड्डी आणि रवींद्र जडेजावर होती. दोघांनी मिळून आठव्या विकेटसाठी ३० धावा जोडल्या. पण नितीश कुमार रेड्डी १३ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला.
हे मुळीच सोपं नसतं
इथून पुढे रवींद्र जडेजाचं काम आणखी कठीण झालं, कारण त्याला खालच्या फळीतील फलंदाजांसोबत फलंदाजी करायची होती. जे संघातील मुख्य फलंदाजांना नाही जमलं ते बुमराह आणि सिराजने करून दाखवलं. धावा कमी होत्या पण विकेट वाचवणं खूप महत्वाचं होतं. ही जबाबदारी जडेजाने योग्यरित्या पार पाडली. बुमराहने १०० मिनिटं फलंदाजी केली. त्याने ५४ चेंडूंचा सामना करत ५ धावा केल्या. इंग्लंडने जडेजाला नॉन स्ट्राईकला ठेवून बुमराहला बाद करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण जडेजाने प्रत्येक षटकातील सुरूवातीचे ४ चेंडू खेळून काढले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. पण जेव्हा जडेजा नॉन स्ट्राईकला राहिला, तेव्हा त्याने बुमराहचा आत्मविश्वासही वाढवला. बुमराह नको तो फटका मारून बाद झाला. त्यानंतर सिराज फलंदाजीला आला.
सिराज आणि जडेजाने मिळून संघाला विजयाच्या जवळ नेलं. सिराजनेही जडेजाला चांगली साथ दिली. जोफ्रा आर्चरचा एक चेंडू सिराजच्या खांद्याला लागला. पण तो पुन्हा फलंदाजीला उभा राहिला. त्यानंतर शोएब बशीरचा एक चेंडू सिराजने डिफेन्स केला, पण तो टप्पा पडून यष्टीला जाऊन लागला. त्यामुळे अनलकी सिराज ३० चेंडू खेळून ४ धावांवर बाद होऊन माघारी परतला.पण जडेजा शेवटपर्यंत १८१ चेंडू खेळून ६१ धावांवर नाबाद राहिला. खालच्या फळीतील फलंदाजांना घेऊन धावांचा पाठलाग करणं हे मुळीच सोपं नसतं. पण जडेजाने हे अनेकदा करून दाखवलं आहे.