भारतात महिला क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून याचाच प्रत्यय मंगळवारपासून सुरू झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत आला. भारत आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे झालेल्या या सामन्यासाठी २२ हजार ८४३ चाहते स्टेडियममध्ये उपस्थित राहिले. महिला विश्वचषकातील एका साखळी सामन्यासाठी सर्वाधिक उपस्थितीचा हा विक्रम ठरला.
गेल्या वर्षी महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान साखळी सामन्यासाठी १५ हजार ३९५ प्रेक्षकांची उपस्थिती होती. आता हा विक्रम मोडीत निघाला आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात आसामचे प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांना संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध संगीतकार पापोन, जोई बरुआ आणि कॉयर यांनी सादरीकरण केले. त्यानंतर श्रेया घोषाल आणि नुवाधिका कुमारी यांनी प्रतिस्पर्धी देशांचे राष्ट्रगीत गायले. डावाच्या मध्यात श्रेया घोषाल यांनी लोकप्रिय गाणी सादर केली. त्याच वेळी ‘आयसीसी’च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेल्या भारतीय महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी, नीतू डेव्हिड, शांता रंगास्वामी, प्रमिला भट्ट, पौर्णिमा राव, अंजुम चोप्रा आणि मिताली राज यांचा ‘बीसीसीआय’ने सन्मान केला.
पाकिस्तानची आज बांगलादेशशी गाठ
कोलंबो : पाकिस्तानचा संघ महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेस आज, गुरुवारपासून सुरुवात करणार असून त्यांच्यासमोर बांगलादेशचे आव्हान असेल. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आपला संघ भारतात पाठविण्यास नकार दिल्याने या संघाचे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत. पाकिस्तानचा विजयी सलामीचा प्रयत्न असेल. यानंतर त्यांना रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध खेळायचे आहे. फातिमा सनाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान महिला संघाला विश्वचषकाच्या पात्रता फेरीत खेळावे लागले होते. यात सर्वोत्तम कामगिरी करत त्यांनी विश्वचषक पात्रता मिळवली. आता मुख्य स्पर्धेतही चांगल्या कामगिरीचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल.
वेळ : दुपारी ३ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, जिओहॉटस्टार ॲप.