पीटीआय, लखनऊ

Indian Premier League cricket सलामीच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर दमदार पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघापुढे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान असेल. नवा कर्णधार एडिन मार्करमच्या उपलब्धतेमुळे हैदराबाद संघाची ताकद वाढणार असून त्याचे नेतृत्व कितपत प्रेरणादायी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करत असल्याने मार्करमला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीला मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने हैदराबाद संघाचे नेतृत्व केले. परंतु हैदराबादला राजस्थानकडून ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर मार्करमसह मार्को जॅन्सन आणि हेन्रिक क्लासन हे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू हैदराबादच्या संघात दाखल झाले. त्यामुळे लखनऊविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा संघ कामगिरी उंचावेल अशी अपेक्षा आहे.

हैदराबादच्या संघाने ‘आयपीएल’च्या गेल्या दोन हंगामांत निराशाजनक कामगिरी केली. २०२१मध्ये हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला, तर १० संघांचा समावेश असलेल्या गेल्या हंगामात ते आठव्या स्थानावर होते. त्यामुळे हैदराबादच्या व्यवस्थापनाने मार्करमवर कर्णधारपदाची धुरा सोपवली. मार्करमच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स इस्टर्न केप संघाने दक्षिण आफ्रिकन ट्वेन्टी-२० लीगच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद मिळवले. आता तो हैदराबादच्या संघाला यश मिळवून देईल अशी चाहत्यांना व व्यवस्थापनाला आशा असेल.

यंदा सलामीच्या लढतीत हैदराबादला चांगला खेळ करता आला नाही. राजस्थानने ‘पॉवर-प्ले’मध्ये हैदराबादवर वर्चस्व गाजवले. प्रथम गोलंदाजीत ‘पॉवर-प्ले’च्या सहा षटकांत ८५ धावा दिल्यानंतर फलंदाजीत हैदराबादला २ बाद ३० धावाच करता आल्या. त्यामुळे हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी हैदराबादच्या संघाला कामगिरीत बरीच सुधारणा करावी लागणार आहे.

दुसरीकडे, लखनऊ संघाला यंदाच्या हंगामात सुरुवातीला संमिश्र यश मिळाले आहे. सलामीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सला नमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात लखनऊला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे लखनऊ संघाचा कामगिरीत सातत्य आणण्याचा प्रयत्न असेल.

वेळ : सायं. ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदूी, जिओ सिनेमा