रिचा घोषची दमदार फटकेबाजी आणि अथक प्रयत्न आरसीबीला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले आणि दिल्ली संघाने आरसीबीच्या संघावर १ धावेने विजय मिळवला. २९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार लगावणाऱ्या रिचाने शेवटच्या चेंडूपर्यंत संघाला विजय मिळवून देण्याचा आठोकाठ प्रयत्न केला पण शेवटी विफल ठरला. शेवटच्या चेंडूत २ धावा हव्या असताना रिचा मोठा फटका मारायला चुकली अन् एक धाव घेण्याच्या नादात ती धावबाद झाली. दिल्लीच्या संघाने तिला आळा घालण्यास केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि १ धावेने विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्सनंतर दिल्लीच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

आरसीबीच्या संघाला डावाच्या सुरूवातीलाच मोठा धक्का बसला तो कर्णधार स्मृतीच्या विकेटच्या. कर्णधार स्मृती मानधना ७ चेंडूत ५ धावा करत ॲलिस कॅप्सीच्या चेंडूवर LBW झाली. स्मृती बाद झाल्यानंतर अनुभवी फलंदाज एलिस पेरी (४९) आणि मोलिनक्स (३३) यांनी संघाचा डाव सावरला. पण त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. अनुभवी फलंदाज पेरीचे मैदानात राहणे महत्त्वाचे होते, जीवदान मिळूनही ती एक धाव घेण्याच्या नादात धावबाद झाली. सोफी डिवाईनचा (२६ धावा) लक्ष्याचा पाठलाग करतानाचा रेकॉर्ड चांगला असल्याने ती सामना जिंकवून देईल असे वाटत होते पण ती फारशी मोठी कामगिरी करू शकली नाही. त्यानंतर संघाचा डाव सावरत असलेली रिचा संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली खरी पण रिचाच्या ५१ धावांच्या खेळीने सर्वांची मने जिंकली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत त्यांनी १८१ धावा केल्या. जेमिमा रॉड्रीग्ज आणि कॅप्सीच्या दमदार शतकी भागीदारीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. मेग लॅनिंग (२९) आणि शेफाली वर्माने (२३) संघाला चांगली सुरूवात करून दिली, त्यानंतर जेमिमाने ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५८ धावा केल्या तर कॅप्सीने ८ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. आरसीबीकडून युवा फिरकीपटू श्रेयंका पाटीलने २६ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आशा शोभनाला १ विकेट घेण्यात यश आले.