नरसिंग यादव प्रकरणाने क्रीडाजगतापुढे भारताची शोभा झालीच, पण कुस्तीही चीतपट झाली. या प्रकरणात कोणाकडूनही ठोस गोष्ट पाहायला मिळाली नाही. साराच संशयकल्लोळ. हे प्रकरण का उकरले गेले आणि त्याचा शेवट ज्या पद्धतीने होत आहे, ते सारे संशय निर्माण करणारे आहे.
राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) नरसिंगची २ जूनला चाचणी घेतली होती. त्यामध्ये तो निर्दोष होता. पण त्यानंतर ऑलिम्पिक काही दिवसांवर असताना त्याच्या तीन चाचण्या का घेतल्या गेल्या? ‘नाडा’कडून हे कुणी करवून घेतले का? हे अनाकलनीयच. नरसिंग चाचणीत दोषी आढळल्यावर तर त्याचे नाव जाहीर का करण्यात आले? त्यापूर्वी त्याचे प्रशिक्षक, क्रीडामंत्री यांच्याशी संवाद का साधला गेला नाही? ऑलिम्पिकपूर्वी कुणी खेळाडू उत्तेजक घेणार नाही आणि नरसिंग या प्रकरणात कट-कारस्थान झाल्याचे सांगत असतानाही त्याला शिस्तपालन समितीपुढे उभे करून काय साधले गेले? सुनावणीदरम्यान ‘नाडा’च्या वकिलांनी नरसिंगला हे कारस्थान असल्याचे सिद्ध करावे लागेल, अन्यथा त्याला शिक्षेला सामोरे जावे लागेल, अशी भूमिका मांडली होती. नरसिंगने कोणते याबाबतचे ठोस पुरावे समितीपुढे सादर केले? हेदेखील लोकांपुढे आले नाही. जर त्याने पुरावे दिले नसतील तर त्याला ऑलिम्पिकसाठी हिरवा कंदील कसा देण्यात आला? पुरावे नसताना नरसिंगला या प्रकरणी निर्दोष ठरवण्यात कुणी दबाव आणला का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. या साऱ्या प्रकरणात ‘नाडा’ची संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात आहे.
नरसिंग सोनीपतच्या ‘साइ’च्या केंद्रात राहत असताना हा सारा प्रकार घडला. या वेळी ‘साइ’च्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर येतो. दिल्लीतील दोन खेळाडू या केंद्रात येऊन नरसिंगच्या रूमजवळ कसे जाऊ शकतात, त्याचबरोबर या गोष्टींचे सीसीटीव्ही फूटेज देण्यात ते कुचराई का करताना दिसतात, ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंसाठीची हीच का सुरक्षाव्यवस्था? असे प्रश्न उभे ठाकले जातात. पण यावर ‘साइ’कडून काहीही सुसंगत उत्तर येत नाही. नरसिंगने सोनीपत पोलीस स्थानकामध्ये या दोन्ही संशयितांची तक्रार दाखल केली होती. या दोघांची कोणती चौकशी झाली? ते दोषी की निर्दोष, याबाबतचा निकाल येणार कधी? हेदेखील सर्वासमोर आलेले नाही.
भारतीय कुस्ती महासंघाने आम्ही नरसिंगच्या पाठीशी आहोत, असे म्हटले होते. पण या प्रकरणाचा छडा लागण्यापूर्वीच त्यांनी जागतिक संघटनेला नरसिंगऐवजी प्रवीण राणाचे नाव पाठवण्यात लगीनघाई का केली? या वेळी नरसिंग आणि प्रवीण या दोघांचाही विचार करण्यात आला नाही. त्याचबरोबर ‘नाडा’ने हिरवा कंदील दिला असला तरी ‘वाडा’ने निर्दोष ठरवले नसताना पुन्हा नरसिंगचे नाव पाठवण्याची घाई महासंघाने का केली? हे पचनी पडत नाही.
नरसिंगने कारस्थान झाल्याचे सांगितल्यावरही खेळ, खेळाडू, संघटनांचा कैवार घेणाऱ्या आणि मुंबई व महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी असलेल्या जाणत्या राजाला या वेळी या अन्यायाबाबत काहीही भाष्य करावेसे का वाटले नाही? हा मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत क्रीडा क्षेत्रात त्यांनी बरेच बदल केले, त्याचबरोबर त्यांच्या नावाला वजनही आहे. ते या प्रकरणी नरसिंगच्या पाठीशी उभे राहिले असते तर त्यालाही मानसिक आधार मिळाला असता. पण क्रीडा क्षेत्र हादरवणाऱ्या या प्रकरणात जाणत्या राजाने मौनच पाळणे का पसंत केले?
या प्रकरणापूर्वी सुशील कुमारने न्यायालयात धाव घेतली होती. नरसिंग आणि माझ्यामध्ये चाचणी घ्यावी आणि जो जिंकेल त्याला ऑलिम्पिकला पाठवावे, अशी त्याने मागणी केली होती. पण त्याच्या पदरी पराभव पडला. त्यामुळे सुशील आणि त्याचे प्रशिक्षक सत्पाल यांनी हे कारस्थान केल्याचे म्हटले जात होते. पण त्यांचीही कोणतीच चौकशी झाली नाही. एकंदरीत हे प्रकरण फक्त भारतासारख्या देशातच घडू शकते. कारण येथे कशामध्येच सूत्रबद्धता, विश्वासार्हता नाही. मुळात क्रीडासंस्कृती नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. त्यामुळेच हे प्रकरण घडले. यापुढे ही अशी होणारी शोभा कशी टाळता येईल, हेच या प्रकरणातून शिकण्यासारखे आहे.
– प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com