रिओ ऑलिम्पिक सुरु झाल्यापासून अनेकांनाच पदकाची आस लागून राहीलेली असतानाच कुस्तीपटू साक्षी मलिकने तमाम भारतीयांची ही इच्छा पूर्ण केली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले आहे. ऑलिम्पिकच्या बाराव्या दिवशी ८-५ अशा गुणांसह साक्षीने किर्गिजस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हरला पराभूत केले. बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला. साक्षीच्या या कामगिरीमुळे सध्या तिला ‘सुलतान’ म्हणूनही संबोधले जात आहे.
कांस्यपदक जिंकलेल्या साक्षी मलिकचे सध्या अनेकांकडून कौतुक केले जात आहे. या कौतुकासोबतच साक्षीवर आर्थिक स्वरुपातील बक्षिसांचीही बरसात होत आहे. अडीच कोटींपेक्षाही जास्त रकमेची बक्षिसे सध्या साक्षीची वाट पाहात आहेत.
साक्षीच्या या यशासाठी घोषित करण्यात आलेली काही बक्षिसे:
* हरियाणा सरकारने ऑलिम्पिक पदक विजेत्यांपैकी सुवर्णपदक विजेत्यांना ६ कोटी, रौप्यपदक विजेत्यांना ४ कोटी आणि कांस्यपदक विजेत्यांना २ कोटी रुपयांचे बक्षिस आणि त्या राज्यात बक्षिसपात्र जमीन देण्याची घोषणा केली आहे.
* रेल्वेतर्फे सुवर्णपदक विजेत्यांना १ कोटी, रौप्यपदक विजेत्यांना ७५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ५० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. साक्षी उत्तर रेल्वेमध्ये काम करत असल्यामुळे तिच्या वाट्याला ५० लाख रुपयांचे बक्षिस येणार असून तिच्या पदाचीही बढती करण्याची घोषणा उत्तर रेल्वेतर्फे करण्यात आली आहे.
* ‘इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे एका बैठकीदरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ‘नॅशनल ऑलिम्पिक बॉडी’च्या वतीने प्रथमच सुवर्णपदक विजेत्यांना ५० लाख, रौप्यपदक विजेत्यांना ३० लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना २० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
* पदक विजेत्या खेळाडूंसोबतच त्यांच्या प्रशिक्षकांनाही आर्थिक स्वरुपातील बक्षिसे मिळणार आहेत.
* अभिनेता सलमान खान सुद्धा ऑलिम्पिकमधील प्रत्येक भारतीय खेळाडूला प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये देणार आहे.
दरम्यान साक्षी आणि आयसुलू यांच्यातील ही लढत अटीतटीची होती. त्यामुळे सामना क्षणाक्षणाला रंग बदलत होता. रशियाच्या महिला कुस्तीपटूने अंतिम फेरी गाठल्यामुळे साक्षीला कांस्यपदकाची लढत देण्याची संधी मिळाली आणि साक्षीनेसुद्धा मिळालेल्या संधीचे सोने करत भारताला कांस्य पदक मिळवून दिले. साक्षी मलिकने मिळवलेल्या यशामुळे सध्या सबंध क्रीडाक्षेत्रामध्ये अनंदाची लाट पसरली असून सर्वत्र साक्षीच्याच नावाची चर्चा आहे.