दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. अलीकडेच ‘अ’ संघाकडून खेळताना पंतने तंदुरुस्ती आणि लय सिद्ध केली. त्यामुळे निवड समितीने त्याचा कसोटी संघात समावेश करताना त्याला पुन्हा उपकर्णधारपदाची जबाबदारीही दिली आहे.
जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाजीदरम्यान पंतच्या पायाला चेंडू लागला होता. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्याला चार महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागले. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून गेल्याच आठवड्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध त्याने ९० धावांची शानदार खेळी केली होती.
भारतीय संघाने गेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध २-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. त्या संघातील यष्टिरक्षक-फलंदाज नारायण जगदीशन आणि वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी पंत आणि आकाश दीपचा समावेश करण्यात आला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे आकाश दीपला काही काळ मैदानाबाहेर राहावे लागले. परंतु त्याने इराणी चषक आणि रणजी करंडकातून यशस्वी पुनरागमन केले आहे.
पंतच्या पुनरागमनामुळे संघनिवडीचा पेच निर्माण होऊ शकेल. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी केली होती. विंडीजविरुद्धच्या कसोटीत त्याने शतक साकारले होते. पंत पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक असल्याने जुरेलला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवणे अवघड जाऊ शकेल. मात्र, तिसऱ्या क्रमांकावरील साई सुदर्शनला कामगिरी उंचावण्यात अपयश आल्यास त्याच्या जागी जुरेलला केवळ फलंदाज म्हणून खेळविण्याबाबत भारतीय संघ विचार करू शकेल.
संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार / यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, आकाश दीप.
मालिकेचा कार्यक्रम
पहिली कसोटी : १४ ते १८ नोव्हेंबर, कोलकाता
दुसरी कसोटी : २२ ते २६ नोव्हेंबर, गुवाहाटी
शमीला पुन्हा डावलले
अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा कसोटी संघातील स्थानापासून वंचित राहावे लागले आहे. तंदुरुस्तीबाबत संभ्रम असल्याने शमीला याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून डावलण्यात आले होते. मात्र, त्यानंतर रणजी करंडकात त्याने बंगालसाठी सलग तीन सामने खेळले. त्यात त्याने एकूण १५ बळीही मिळवले. मात्र, ३५ वर्षीय शमीला पुन्हा कसोटी संघाबाहेर ठेवण्यात आल्याने आता त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्दच धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘अ’ संघांतील सामना आजपासून
बंगळूरु : भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांतील दुसरा अनौपचारिक कसोटी सामना आज, गुरुवारपासून खेळवला जाणार आहे. भारताने पहिला सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. आता दुसऱ्या सामन्यात कर्णधार ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या भारतीय खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बव्हुमाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. तसेच पहिल्या अनौपचारिक कसोटीत साई सुदर्शन झगडताना दिसला. त्यामुळे त्याचाही कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल.
