Rohit Sharma Fan Video Viral: टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा आगामी ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी सज्ज होत आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा कसून सराव करत असल्याचं दिसत आहे. हिटमॅन आज सरावासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पोहोचला होता. जिथे रोहित शर्माला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यानचा रोहितच्या चाहत्याचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह ६ महिन्यांच्या कालावधीने क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे रोहितने सरावात कोणतीही कमी पडू दिलेली नाही. अलीकडेच वनडे संघाचं नेतृत्त्व शुबमन गिलकडे सोपवण्यात आल्यानंतरही रोहितने आपल्या सरावात काही बदल केलेला नाही. सराव सत्रादरम्यान रोहित पूर्ण फॉर्मात दिसला. त्याने फलंदाजी करताना विविध प्रकारचे आकर्षक फटके खेळले, काही अप्रतिम कव्हर ड्राइव्ह्स आणि कमालीचे स्वीप शॉट्स खेळताना दिसला.

शेकडो चाहत्यांनी मैदानाभोवती जमून आपल्या लाडक्या हिटमॅनला दाद दिली. भारतीय संघाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि रोहितचा मित्र अभिषेक नायरने या सराव सत्रात हजेरी लावत त्याला मार्गदर्शन केलं. त्याच्याबरोबर मुंबई आणि KKR चा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी आणि काही स्थानिक खेळाडूही उपस्थित होते. दरम्यान, रोहितची पत्नी रितिका सुद्धा मैदानावर दिसली. सरावानंतर रोहितने शिवाजी पार्कमध्ये जमलेल्या चाहत्यांना हात दाखवत प्रतिसाद दिला, त्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानले.

रोहित शर्मा सराव करत असताना चाहत्यांनी त्याच्या सरावाचे अनेक व्हीडिओ काढले आहेत. यापैकी एका व्हीडिओमध्ये चाहते मुंबईचा राजा रोहित शर्मा या घोषणा देत आहे. या घोषणा देत असताना हिटमॅनच्या एका चाहत्याने त्यांना दटावलं. तो म्हणाला, “ए शर्मा नाही सर बोल, कानाखाली देईन…” त्या चाहत्याचं वाक्य ऐकताच सर्वच जण हसू लागले. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआय आणि निवड समितीला खूप सुनावलं. पण वनडे संघाच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही रोहित संघाचा महत्त्वाचा भाग राहणार आहे. आगामी काळात तो नव्या कर्णधार शुबमन गिलला मार्गदर्शन करेल, तसेच त्याने सलामीवीर म्हणून आपल्या आक्रमक शैलीत सातत्य राखण्याची अपेक्षा संघ व्यवस्थापनाकडून केली जात आहे.