Team India Fitness Test: भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माची बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलेंसमध्ये प्री सिजन फिटनेस टेस्ट होणार आहे. या फिटनेस टेस्टमध्ये रोहितसह कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांची देखील यो-यो टेस्ट होणार आहे. यासह डेक्सा स्कॅन आणि ब्लड टेस्ट देखील केली जाणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्याआधीच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान निवृत्तीनंतर तो पहिल्यांदाच फिटनेस टेस्ट देणार आहे. मात्र, विराट कोहली ही फिटनेस टेस्ट कधी देणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी विराट लॉर्ड्सच्या मैदानावर सराव करताना दिसून आला होता. त्यामुळे तो अजूनही लंडनमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. विराट आणि रोहित आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा खेळून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू आहे. पण या स्पर्धेला अजूनही २ वर्ष शिल्लक आहेत. तोपर्यंत हे दोघे खेळणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “सर्व खेळाडूंना प्री सिजन फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. करारानुसार हे सर्वांसाठी बंधनकारक आहे. या टेस्टमुळे खेळाडूंना आणखी कशात सुधारणा करण्याची गरज आहे, हे समजून येतं. इंग्लंड दौऱ्यानंतर मोठा ब्रेक मिळाला होता, त्यामुळे खेळाडूंना घरीच व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला होता.”

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अभिषेक शर्माचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो जिममध्ये व्यायाम करत असल्याचं दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने,”सुरूवात झाली आहे..”, असं लिहिलं होतं. यावरून हे स्पष्ट झालं की, रोहित देखील फिटनेस टेस्टसाठी स्वत:ला तयार करत होता. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी आधीच फिटनेस टेस्ट दिली आहे. भारतीय संघ येत्या ९ सप्टेंबरपासून आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित पुनरागमन करताना दिसून येऊ शकतात.