Rohit Sharma MS Dhoni Coincidence of Retirement: रोहित शर्माने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आणि सर्वांना धक्का दिला. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माने कसोटी कॅपचा फोटो शेअर करत कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. पण रोहितच्या या निवृत्तीचं एम एस धोनीशी खास कनेक्शन आहे.
रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिलं की, ” मला सर्वांना हे सांगायचं आहे की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचं नेतृत्त्व करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला इतकं वर्ष खूप प्रेम आणि कायम पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. मी वनडे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहणार आहे.”
रोहित शर्माची कसोटी निवृत्ती आणि एमएस धोनीच्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये एक मोठं साम्य आहे. भारताचे दोन्ही उत्कृष्ट कर्णधारांनी अगदी सारख्याच वेळी पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली, हा अनोखा योगायोग समोर आला आहे.

रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर जेव्हा स्टोरी शेअर केली तेव्हा संध्याकाळचे बरोबर ७ वाजून २९ मिनिट झाली होती. धोनीने देखील पाच वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने संध्याकाळी सोशल मीडियावर अचानक पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली होती. धोनीने पोस्टमध्ये म्हटले होते की, तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी तुमचा आभारी आहे, १९.२९ पासून मी निवृत्त झाल्याचे जाहीर करत आहे. या कॅप्शनसह त्याने त्याच्या कारकिर्दीतील काही क्षणांचा व्हीडिओ पोस्ट केला होता.
रोहितची निवृत्ती कदाचित धोनीसारखी पूर्णपणे अचानक नव्हती. काही वेळापूर्वीच द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले होते की इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी निवडकर्त्यांनी त्याला कसोटी कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. “निवडकर्त्यांची विचारसरणी स्पष्ट आहे. त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी नवीन कर्णधार हवा आहे आणि रोहितचा कसोटीमधील फॉर्म पाहता रोहित कर्णधार म्हणून त्यांच्या प्लॅन्समध्ये नीट बसत नाहीये. त्यांना पुढील कसोटी मालिकेसाठी एका युवा कर्णधाराची निवड करायची आहे आणि निवड समितीने बीसीसीआयला कळवले आहे की रोहित संघाचे नेतृत्व करणार नाही,” असे रोहितने आपला निर्णय जाहीर करण्यापूर्वी भारतीय बोर्डातील एका सूत्राने या वृत्तपत्राला सांगितले होते.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर चाहत्यांनी धोनी आणि रोहितच्या निवृत्तीच्या वेळेमधील हे साम्य टिपलं. यानंतर चाहत्यांनी रोहित आणि धोनीच्या य निवृत्तीबाबत पोस्टचा पाऊस पाडला आणि भावुक प्रतिक्रिया दिल्या.