Rohit Sharma Viral Video: भारतीय संघातील अनुभवी फलंदाज रोहित शर्माने कसोटी आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषण केली आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. येत्या काही दिवसांत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर रोहित पुनरागमन करताना दिसणार आहे. या दौऱ्याआधी त्याने सराव करायला देखील सुरुवात केली आहे. सराव करत असतानाचा व्हिडिओ त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर त्याची पत्नी रितिका सजदेहने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.

रोहित शर्माने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात तो नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करण्यासाठी जाताना दिसत आहे. त्यानंतर तो नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने, “खूप बरं वाटतंय..” असं लिहिलं आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पण पत्नी रितिका सजदेहने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिने या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत, goosebumps असं लिहिलं आहे आणि पुढे भावुक झाल्याचा ईमोजी शेअर केला आहे. रितिकाने दिलेली ही प्रतिक्रिया तुफान व्हायरल होत आहे.

रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढउतार आले. पण रितिकाने त्याची साथ कधीच सोडली नाही. प्रत्येक सामन्यात रोहितला समर्थन करण्यासाठी ती स्टेडियममध्ये हजेरी लावत असते. भारतीय संघाला २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवानंतर रोहित शर्मावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण या कठीण काळात रितिकाने त्याला सपोर्ट केला. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आणि २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही विजेतेपद पटकावलं. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर इंग्लंड दौरा सुरू होण्याआधी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. आता तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुनरागमन करताना दिसून येणार आहे.