भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने घोषणा करताच भारतीय चाहत्यांना धक्काच दिला. रोहित शर्माला भारताच्या वनडे कर्णधारापदावरून हटवत शुबमन गिलकडे संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यादरम्यान रोहित शर्माचा सहकारी आणि खास मित्र अभिषेक नायरचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने मुंबईच्या कर्णधारपदावरून रोहितला कसं काढलं हे सांगितलं आहे.

२०२१ मध्ये एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून सूत्र हाती घेतल्यापासून, रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक प्रभावी विक्रम नोंदवला आहे. त्याचा विजयाची टक्केवारी ही ७३.५ आहे, जी १०० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील संघाचे नेतृत्त्व केलेल्या कर्णधारांमध्ये सर्वोत्तम आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत भारताला टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा रोहित २०२३ मध्ये विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ होता. पण, रोहितला त्याच्या सुरुवातीच्या काळात एक सक्षम कर्णधार मानले जात नव्हते.

भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि रोहित शर्माचा क्रिकेट सहकारी व खास मित्र अभिषेक नायरने अलीकडेच एक मोठा खुलासा केला आहे. रोहितला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात “वेडा आणि मूडी” कर्णधार म्हणून कर्णधारपदावरून हटवले होते. ही १३ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा रोहित भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघात कायमचा नव्हता. त्या हंगामात जखमी आगरकरच्या जागी रोहितला मुंबईचा रणजी ट्रॉफी कर्णधार म्हणून कसे नियुक्त करण्यात आले, परंतु केवळ दोन सामन्यांनंतर त्याला काढून टाकण्यात आले, हे नायरने सांगितले.

आशिष कौशिक पॉडकास्टमध्ये अभिषेक नायर म्हणाला, “रोहित जेव्हा मुंबई रणजी संघाचे नेतृत्व करत होता तेव्हा त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होतं, ही घटना फार कमी लोकांना माहिती आहे. पण, त्या वर्षी आम्ही जिंकलो होतो. अजित आगरकर कर्णधार होता. पण त्याला स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आणि रोहित दोन सामन्यांसाठी स्टँड-इन कर्णधार झाला. तो (रोहित) पागल आहे. मुंबई क्रिकेटमध्ये असा समज होता की तो क्रिकेटपटू म्हणून अविश्वसनीय आहे, परंतु कर्णधार मूडी आहे. त्याच्या जागी मला संघाचं नेतृत्त्व करण्याची जबाबदारी दिली. मग अजित परत आल्यावर त्याला पुन्हा कर्णधार करण्यात आलं.”