पीटीआय, जयपूर

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी निर्णायक खेळी करणारा रियान पराग गेले तीन दिवस आजारी होता. मी अंथरुणाला खिळून होतो आणि वेदनाशामक औषधे घेऊन या सामन्यात खेळलो, असे रियानने गुरुवारी झालेल्या सामन्यानंतर सांगितले.

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वांत प्रतिभावान खेळाडूंपैकी एक अशी रियानची ओळख आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये आसामसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या रियानला गेल्या काही वर्षांत ‘आयपीएल’मध्ये मात्र फारसे यश मिळाले नव्हते. असे असले तरी राजस्थान रॉयल्सने त्याच्यावरील विश्वास कायम राखला आणि यंदाच्या हंगामात त्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. या संधीचे सोने करताना त्याने पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २९ चेंडूंत ४३ धावांची खेळी केली. त्यानंतर कामगिरीत आणखी सुधारणा करताना त्याने गुरुवारी झालेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ४५ चेंडूंत नाबाद ८४ धावा फटकावल्या. ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीवर १२ धावांनी विजय मिळवला.

हेही वाचा >>>विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

‘‘मी गेले तीन दिवस अंथरुणाला खिळून होतो आणि वेदनाशामक औषधे घेऊन सामन्यात खेळलो. मला काहीही करून सामन्यात खेळायचे होते. त्यामुळे मी खूप खूश आहे. माझ्यासाठी ही खेळी खास आहे,’’ असे दिल्लीविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना रियान म्हणाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची ३ बाद ३६ अशी स्थिती होती. मात्र, रियानने अप्रतिम खेळी करताना राजस्थानला २० षटकांत ५ बाद १८५ धावांपर्यंत पोहोचवले. त्याने आनरिख नॉर्किएने टाकलेल्या २०व्या षटकात २५ धावा काढल्या.

‘‘माझी आई हा सामना बघायला आली होती. गेल्या तीन-चार वर्षांत मी घेतलेली मेहनत तिने पाहिली आहे. मी इतरांच्या मतांचा फार विचार करत नाही. माझ्यात असलेली क्षमता मला ठाऊक आहे. मी किती धावा करतो, यश मिळवतो की अपयशी ठरतो याने मी स्वत:वरील विश्वास कमी होऊ देत नाही. यंदाच्या देशांतर्गत हंगामात मी चांगली कामगिरी केली. त्यामुळे ‘आयपीएल’ हंगामापूर्वी माझा आत्मविश्वास दुणावला होता,’’ असेही रियानने नमूद केले.

हेही वाचा >>>RCB vs KKR : कोलकाताचा बंगळुरूमध्ये विजयी विक्रम कायम, केकेआरकडून आरसीबीचा ७ गडी राखून पराभव

रियानने यंदा सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत आसामचे कर्णधारपद भूषवताना उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने १० डावांत सर्वाधिक ५१० केल्या. यात सात अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याने ११ गडीही बाद केले होते. त्याच्या या कामगिरीमुळे आसामने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

सॅमसनकडून स्तुती

दिल्लीविरुद्ध राजस्थानचा संघ अडचणीत असताना रियानने केलेल्या खेळीने कर्णधार संजू सॅमसन प्रभावित झाला. त्याने रियानची स्तुती केली. ‘‘गेल्या काही वर्षांत रियान पराग हे नाव खूप चर्चेत आहे. मी जिथेही जातो, तिथे मला त्याच्याबाबत विचारले जाते. तो भारतीय क्रिकेटसाठी काही तरी खास योगदान देऊ शकतो अशी माझी धारणा आहे,’’ असे सॅमसन म्हणाला.