Sachin Tendulkar On Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचे महानायक, द अँग्री यंग मॅन म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. यानिमित्त सकाळपासूनच अनेकांनी बिग बी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र या सगळ्या शुभेच्छांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेतायत. सचिन व अमिताभ बच्चन या दोघांनीही आपापल्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. बच्चन यांना शुभेच्छा देण्यासाठी सचिनने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी कौन बनेगा करोडपती स्टाईलमध्ये शेहेनशाहांचं कौतुक केलं आहे.

सचिनने अमिताभ बच्चन यांच्यासह फोटो शेअर करून, खाली केबीसीच्या फॉरमॅटमध्ये, “अमिताभ बच्चन कोण आहेत?” असा प्रश्न विचारला आहे. व यावर सचिननेच चार पर्याय सुद्धा दिले आहेत. सुपरस्टार, एक आयकॉन, ए लीजेंड आणि वरील सर्व पर्याय असे चार पर्याय दिले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिले की, “वर्षानुवर्षे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले आहेत, आज मी तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न विचारला आहे! तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

‘बिग बी’ हे स्वतः क्रिकेटचे चाहते आहेत व सचिन तेंडुलकरच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहेत. अहमदाबाद येथे शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये एकमेकांना भिडणार आहेत. वृत्तानुसार, नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय-व्होल्टेज संघर्ष पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर असतील. २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला तेव्हा बच्चन यांनी प्रथमच क्रिकेटमध्ये समालोचन केले होते.