मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या इंडिया लेजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सचा ३३ धावांनी पराभव करत रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे विजेतेपद पटकावले. भारताकडून शतक झळकावताना नमन ओझा सामन्याचा हिरो ठरला. इंडिया लिजेंड्ससमोर या सामन्यात श्रीलंका लिजेड्स संघाचे आव्हान होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १९५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघाने सर्वबाद १६२ धावा केल्या. ही सलग दुसरी वेळ आहे, जेव्हा भारताने हा चषक जिंकला.
पहिल्या सत्रातही भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला होता. सामन्याचा हिरो ठरलेल्या यष्टीरक्षक नमन ओझाने ७१ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १०८ धावांची तुफानी खेळी केली. त्याव्यतिरिक्त विनय कुमार संघासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. विनयने २१ चेंडूत ३६ धावा केल्या. श्रीलंकेच्या नुवान कुलसेकरा याने तीन षटका टाकून २९ धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक ३ गडी बाद केले. इसुरू उडान याने चार षटकात ३४ धावांच्या बदल्यात २ गडी बाद केले.
शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताने दिलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका लिजेंड्सची वरची फळी अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. दिलशान मनुवीरा आणि सनथ जयसूर्या यांनी अनुक्रमे ८ आणि ५ धावा करून विकेट गमावल्या. इशान जयरत्ने याने श्रीलंकेसाठी सर्वात मोठी खेळी केली. त्याने अवघ्या २२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. पण त्याला संघातील इतर एकही फलंदाज चांगली साथ देऊ शकला नाही. विनय कुमराने भारतासाठी सर्वाधिक ३ बळी घेतले. यादरम्यान त्याने ३.५ षटकात ३८ धावा खर्च केल्या. तसेच अभिमन्यू मिथूनने चार षटकात २७ धावा खर्च करून २ गडी बाद केले.