Sachin Tendulkar son Arjun Took Wicket of Rahul Dravid Son: भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी मैदान गाजवलं आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. या दोघांनंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्या क्रिकेटचा वारसा पुढे नेला आहे. सचिन आणि द्रविडचे लेक देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावत आहेत. यादरम्यान अर्जुन तेंडुलकर आणि समित द्रविड मैदानावर एकमेकांविरूद्ध खेळताना दिसले.
सोमवारी २२ सप्टेंबरला कर्नाटकातील अलूर येथे के. थिम्मप्पिया मेमोरियल स्पर्धेत दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचे लेक एकमेकांविरूद्ध खेळत होते. कर्नाटक सेक्रेटरी इलेव्हनच्या समित द्रविडची विकेट घेत अर्जुन तेंडुलकरने गोव्यासाठी हा सामना संस्मरणीय बनवला.
समित द्रविडने २६ चेंडूत ९ धावांच्या खेळीदरम्यान दोन चौकार मारले. एक फटका लॉन्ग ऑनच्या दिशेने आणि दुसरा कव्हरच्या दिशेन लगावला. पण, अर्जुन तेंडुलकरने त्याला कौशल बकालेकरवी झेलबाद करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. या स्पर्धेत कर्नाटकचे काही अव्वल खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये करुण नायर आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे, ज्यांनी अलीकडेच इंग्लंडचा दौरा केला होता. करुण या सामन्यात खेळत आहे आणि तो ३ धावांवर बाद झाला.
गोव्याकडून अर्जुन तेंडुलकरने तीन विकेट घेतल्या. मोहित रेडकरने दोन विकेट घेतल्या. कोशिक व्ही आणि अभिनव तेजराणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. गोव्याने पहिल्या डावात ३३८ धावा केल्या. ललित यादव ११३ धावांवर नाबाद राहिला. अभिनव तेजराणा यांनी ८८ धावा केल्या. अर्जुन तेंडुलकरने ९ धावा केल्या. तर समित द्रविडने २ बळी घेतले. यावर्षीची के. थिम्मप्पिया मेमोरियल स्पर्धा आगामी २०२५-२६ रणजी ट्रॉफी हंगामापूर्वी होत आहे. यामुळे खेळाडूंना भारताच्या प्रमुख स्थानिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या फॉर्म आणि फिटनेसचे मूल्यांकन करण्याची संधी मिळेल.
सचिन तेंडुलकरनेही राहुल द्रविडला केलं होतं बाद
अर्जुन तेंडुलकरने समित द्रविडची विकेट घेतल्यामुळे एक अनोखा योगायोग समोर आला आहे. सचिन तेंडुलकरने देखील राहुल द्रविडला २२ वर्षांपूर्वी बाद केलं होतं. सप्टेंबर २००३ मध्ये NKP साळवे चॅलेंजर ट्रॉफीमध्ये वेगवेगळ्या संघासाठी खेळताना, तेंडुलकर आणि द्रविड चिन्नस्वामी स्टेडियममध्ये अंतिम फेरीत खेळत होते. या सामन्यात सचिन तेंडुलकरने राहुल द्रविडला २७ धावांवर क्लीन बोल्ड केलं होतं.