India vs England 1st Test: युवा फलंदाज शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ इंग्लंडला ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून लिड्समध्ये रंगणार आहे. या मालिकेआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी आपली प्लेइंग ११ जाहीर केली आहे. तर भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
साई सुदर्शनला पहिल्या कसोटीत संधी मिळणं कठीण
भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. याच कामगिरीच्या बळावर त्याची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याला पहिल्या कसोटीत पदार्पण करायला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात २ अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केला जाणार आहे. ज्यात रविंद्र जडेजा हे नाव निश्चित आहे. तर दुसरा अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी आणि शार्दुल ठाकूरपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. भारतीय संघाला जर एका सामन्यात २ अष्टपैलू खेळाडू खेळवायचे असतील, तर मुख्य फलंदाजांची संख्या कमी करावी लागेल. या वृत्तात असं म्हटलं गेलं आहे की, २ अष्टपैलू खेळाडूंना खेळवल्यास साई सुदर्शनला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
करूण नायरला संधी मिळणार?
भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने पत्रकार परिषदेत, भारतीय संघाच्या फलंदाजीक्रमाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. या दौऱ्यावर शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर खेळणार असल्याची माहिती ऋषभ पंतने दिली आहे. तर पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार, हे अजूनही स्पष्ट झालं नसल्याचं पंतने सांगितलं. दरम्यान पहिल्या कसोटीसाठी करूण नायरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. जर गिल चौथ्या आणि ऋषभ पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असेल, तर करूण नायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. कारण यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरूवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे.